कत्तल केलेल्या असंख्य वृक्षांच्या बदल्यात नवीन झाडांचे वृक्षारोपण करून संगोपनाची जबाबदारी घ्यावी ;परीटवाडी पर्यावरण प्रेमींची मागणी.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थ परीटवाडी यांच्यावतीने मा.तहसीलदार साहेब , वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, व इतरांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे की, मौजे परीटवाडी येथे सौरऊर्जेपासून वीज निर्मिती हा प्रकल्प सुरू झाला आहे.
या प्रकल्पामुळे अमाप वृक्षांची कत्तल केली गेली आहे. तसेच या प्रकल्पासाठी राशिन ते परीटवाडी 33KVलाईन टाकण्यात आलेली आहे त्यामुळे वृक्षारोपणास अडथळा निर्माण झाला आहे. या लाईनची दिशा बदलण्यात यावी किंवा अंडरग्राउंड करण्यात यावी. तसेच प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या रहिवाशांना प्रकाशाच्या परिवर्तनाचा त्रास होत आहे. तरी भक्कम संरक्षित भिंत बांधण्यात यावी.
सदर प्रकल्पाची जागा ही अंदाजे 60 एकर असून ओढ्याजवळ असल्यामुळे या ठिकाणी 50 ते 70 वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, भोकर, कडुलिंब, जांभूळ, बाभूळ या प्रकारची झाडे होती. तसेच बांधावर ही जुनी झाडे थाटात उभी होती. या प्रकल्पामुळे या सर्व झाडांचा सुपडा साफ केला आहे. आणि याचा दुष्परिणाम पर्यावरणावर होऊन तापमान वाढ, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, पाऊस कमी पडणे यासारख्या समस्या गावकऱ्यांना भोगावे लागणार आहेत यात शंका नाही.
झाडे तोडली खरी पण भरपाई म्हणून नवीन झाडे लावली पाहिजे हा विचारही प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला नाही याची एक स्थानिक नागरिक म्हणून खंत वाटते.
सदर झाडांची भरपाई म्हणून राशीन ते परीटवाडी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याची कमीत कमी तीन वर्षे संगोपन करण्याचे लेखी प्रकल्प अधिकाऱ्यांनी द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करून प्रकल्प बंद पाडण्यात येईल.
पर्यावरण प्रेमी सर्व स्थानिक नागरिक परीटवाडी यांच्यावतीने करण्यात येईल.
टीप: वृक्षारोपणाचे नियम व अटी पुढील पानावर. या अटी मान्य करून लेखी देण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्याला पाच दिवसाची वेळ दिली आहे.
वृक्षारोपणाचे नियम व अटी:
1. परीटवाडी ते राशीन 3.5kmरस्त्याच्या दुतर्फा कमीत कमी १००० झाडे लावणे.
2. प्रत्येक झाडामध्ये 30 फूट अंतर असावे.
3. झाडांची रोपे ही चांगल्या प्रतीची, कमीत कमी तीन फूट उंच व सावली देणारी असावी.
4. झाडासाठी खड्डा हा दोन बाय दोन फूट व खोली दोन फूट असावी.
5. खड्ड्यामध्ये सुपीक काळी माती व 20% शेणखत असावे.
6. झाडाला 4 -5 फूट उंचीचे लोखंडी जाळीचे कुंपण असावे.
7. संगोपनासाठी नियमित पाणीपुरवठा खालील प्रमाणे.
वर्ष पहिले: महिन्यातून चार वेळा पाणी देणे
वर्ष दुसरे: महिन्यातून दोन वेळा पाणी देणे
वर्ष तिसरे: महिन्यातून दोन वेळा पाणी देणे.
(प्रत्येक वेळी प्रत्येकी झाडाला 30 लिटर पाणी).
या सर्व मागणे मंजूर न झाल्यास पर्यावरण प्रेमी व परीट वाडी ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक ५.७.२०२४. सकाळी ८ वाजल्यापासून प्रकल्पाच्या गेट समोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांची असेल.