आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून सुरू करून घेतलेल्या खरेदी केंद्रात नाफेडकडून होतेय कांदा खरेदी.
नाफेडच्या खरेदीला विरोध असला तरी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सुरू करून घेतली - आ. रोहित पवार

कर्जत (प्रतिनिधी) :- कांद्याचे सातत्याने ढासळणारे भाव आणि त्यावरुन शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ‘नाफेड’ कडून सध्या कांदा खरेदी केली जात आहे. कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांत सातत्याने कमी होत असल्याने कर्जत जामखेड तालुक्यात जवळपास १ हजार मेट्रीक टन कांदा नाफेड हे खरेदी करत आहे. कर्जत तालुक्यातील दोन ठिकाणी ही कांदा खरेदी केली जात आहे. गुरव पिंप्री आणि मुळेवाडी याठिकाणी जवळपास १ हजार मेट्रीक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. या खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, सातबारा आणि पासबुक हे गुरव पिंप्री किंवा मुळेवाडी येथील खरेदी केंद्रावर जमा करायचे आहेत.
आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून कर्जत जामखेड मतदारसंघात विविध ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्याचा फायदा हा आतापर्यंत शेतकऱ्यांना होतच आला आहे. त्याच खरेदी केंद्रातून आताची ही कांदा खरेदी होत आहे. याअगोदरही दोन महिन्यांपूर्वी कांद्याची खरेदी ही खरेदी केद्रांद्वारे करण्यात आली होती. सध्या बाजारात कांद्याला मिळणारा भाव हा अतीशय कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यातच सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ झुलवत ठेवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता नाफेडद्वारे कांदा खरेदी होत असली तरी यातून फार काही शेतकऱ्यांना फायदा होईल, असे वाटत नाही, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारभाव कमी झाल्यानंतर नाफेडद्वारे कांदा खरेदी करावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी याअगोदरही विधानसभेत मुद्दा उपस्थित करून तसेच प्रत्यक्ष मंत्री, अधिकारी यांना भेटून नाफेडद्वारे कांदा खरेदी करावी अशी विनंती वेळोवेळी केलेली आहे. परंतु नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जातो. तेव्हा कांद्याचे निर्यातक्षम गुणवत्तेचे निकष असतात. या निकषाने नाफेड खरेदी करणार असेल तर बाजाराच्या सरासरी २४१० रुपये दरानेच खरेदी का? बाजाराच्या उच्चांकी २८०० रुपये प्रति क्विंटल अशा दराने खरेदी का केली जात नाही?, असा प्रश्नदेखील आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्यांपैकी 30 ते 40 टक्के कांदा हा खराब झालाय चांगला भाव मिळाला असता तर हे नुकसान भरून काढता आलं असतं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच नाफेडच्या या खरेदीला विरोध असला तरी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण ही केंद्र सुरू करून घेतल्याचे आमदार रोहित पवार म्हणतात.
पूर्वी कर्जत जामखेड तालुक्यात प्रत्येकी दोन असे धान्य खरेदी केंद्र होते. पण दोनच केंद्र असल्याने शेतकऱ्यांना तूर, उडीद अथवा हरभरा विक्रीसाठी जास्त अंतर पार करून जावं लागत होतं. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाढत होता आणि माल घेऊन गेल्यानंतर मर्यादित केंद्र असल्याने आठ-आठ दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागायची आणि मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी जामखेड तालुक्यात ५ आणि कर्जत तालुक्यात ७ अशी एकूण १२ खरेदी केंद्र नाफेडच्या अधिकाऱ्यांना बोलून सुरू करून घेतली. यामुळे आता शेतकऱ्यांना आठ दिवस वाट पाहण्याची देखील गरज राहिली नाही आणि केंद्राची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांनीही आपले धान्य व्यापाऱ्यांना न देता हमीभाव केंद्रात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यास पसंती दर्शवली आहे.