
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतचे वेगवेगळ्या हेडचे अकाऊंट सील केलेले आहेत. या संदर्भात झालेल्या पत्रव्यवहाराबाबत अकाऊंट विभागाच्या प्रमुखाला विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरुन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार नगरसेवक नामदेव राऊत यांनी कर्जत पोलिसात दिली आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ही तक्रार करण्यात आली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
तक्रार अर्जात राऊत यांनी म्हटले आहे, कर्जत नगरपंचायतमध्ये मी सध्या नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. कर्जत नगरपंचायतचे वेगवेगळ्या हेडचे अकाऊंट सील केलेले आहेत. यामुळे नगरपंचायतचे दैनंदिन कामकाज घंटागाडी, ट्रॅक्टर याचे डिझेल व दुरुस्ती तसेच सफाई कर्मचारी, ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांचे पगार व नगरपंचायतचे वीज बिल यासारख्या बाबीमुळे दैनंदिन कामकाज बंद झाले असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांनी लेखा विभागाला खाते बंद केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी व्यवहार केला असता यामध्ये अकाऊंट विभागाच्या प्रमुख नयना कुंभार यांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांना चुकीच्या पद्धतीने उत्तर दिले. त्याच पद्धतीने त्यांनी मला माहिती दिली असल्याचा चुकीचा उल्लेख केला.
याबाबींची विचारणा करण्यासाठी मी गेलो असता, तुम्ही मला विचारणारे कोण, तुमचा संबंध काय येतो. मी याअगोदर ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे. त्याठिकाणी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहे. त्याच प्रकारचा गुन्हा तुम्हावरही दाखल करेल. या पद्धतीची भाषा वापरली व धमकी दिली. तसेच या आधी मी ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे. तेथे माझ्या नादी कोणी लागले नाही. त्यामुळे तुम्ही मला अशा पद्धतीची कुठलीही माहिती विचारायची नाही. तसेच मला वेगळ्या प्रकारच्या भाषेत तुमच्याकडे बघून घेईल, अशी धमकी दिली आहे. संबंधित व्यक्तीच्या विरोधात अरेरावीची भाषा वापरून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात यावा, असे राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.