वाघासारख्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असे वर्तन करू नका… वसंत हंकारे
ज्या घरात आई-वडील नसतात ते घर वाळवंट असते... वसंत हंकारे

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहामध्ये खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संस्कारदिपोभव’ ही एकदिवसीय कार्यशाळा आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व रघुआबा काळदाते व दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त आयोजनातून नुकतीच संपन्न झाली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही कार्यशाळा विविध सत्रांच्या माध्यमातून संपन्न झाली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या मुलांना आतोनात कष्ट करून मागेल त्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मुलांना योग्य संस्कार व मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याच वेळा पालकांकडे वेळ उपलब्ध नसतो. आज मुलांच्या हातात असलेला मोबाईल व डिजिटल प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर केलेले वाईट विचारांचे आक्रमण यातून नवीन पिढी चांगल्या विचारापासून बाजूला पडताना दिसत आहे. आपल्या मुला मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा मुलं मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हाच समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मनस्ताप व्हायचा थांबेल, अनुचित प्रकार थांबेल. तसेच उत्कृष्ट व दमदार व्याख्यानाच्या माध्यमातून नवीन पिढी व समाजामध्ये चांगल्या विचारांची पेरणी करण्याचा व नवीन पिढीला न समजलेले आईबाप समजून सांगण्याचा प्रयत्न व्हावा या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले होते. जीवन सुंदर आहे फक्त जगता आले पाहिजे. आई बापाला सोडून कोणतीच मुलगी पळून जाणार नाही असा आत्मविश्वास देणारी ही कार्यशाळा किशोरवयीन मुलामुलींकरिता तसेच त्यांच्या पालकांकरिता संपन्न झाली.
या कार्यशाळेत वसंत हंकारे आपल्या तीन सत्राच्या मार्गदर्शनात सांगितले की, मुलांना आई-वडिलांसोबतचे नाते दृढ करावे लागेल. पालक आजही आपल्या मुला-मुलींसोबत मनसोक्तपणे संवाद साधत नाहीत. पालकांनी आपल्या मुला-मुलींचा मित्र होणे गरजेचे आहे. आपल्या मुला-मुलीच्या मनातील एक एक गोष्ट तिने तुम्हाला सांगावी आणि आजपर्यंत जे बरे-वाईट अनुभव आले असतील ते पालकांसोबत शेअर करणे गरजेचे आहे. तुमच्या जन्मदात्याची किंमत मुलांसाठी खूप अमूल्य आहे. मुलांनी आई-वडिलांना न विचारता जर निर्णय घेतले तर नुकसान मुलांचेच होते. मुलींनो अचानक पालकांना तुम्ही सोडून गेलात तर बाप कसा कासावीस होतो, अचानक बापाला सोडून गेलात तर त्यांना किती दुःख होत असेल याचाही विचार करा. मुलींनो पळून जाऊन कधीच तुम्ही सुखी होऊ शकणार नाहीत. आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल चुकीचे वर्तन करू नका. आई-वडिलांना मिठी मारायला विसरू नका त्यांच्या पाया पडायला कधीच विसरू नका. शिकून मोठे झाल्यावर अनेक मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवितात. असले यश काय कामाचे, आपल्या यशासाठी पाठीशी उभे असणाऱ्या आई-वडिलांना कधीच विसरू नका. आपला बाप फाटलेले कपडे घालतो, वर्षानुवर्षे एकच चप्पल वापरतो. मुलांना मात्र ब्रँडेड कपडे व महागडे बूट आणून देतो. उधार उसनवारी करतो, कधी कर्जही काढतो परंतु स्वतःच्या चेहऱ्यावर हे कर्ज असलेले दुःख कधी दाखवीत नाही. स्वतः हलाखीचे जीवन जगत मुलांसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आपल्या वाघासारख्या पित्याला तुमच्यामुळे कुठेही खाली मान घालायची वेळ येऊ देऊ नका. पैशाने वस्तू विकत घेता येतात, प्रेम आणि माया खरेदी करता येत नाही. ज्या घरात आई-वडील नसतात ते घर वाळवंट असते.
सायंकाळच्या सत्रात हंकारे यांनी सांगितले की, माझा बाप माझ्यासाठी काय करतो? याचा विचार प्रत्येक मुला मुलीने अंतर्मुख होऊन केला पाहिजे. रात्रीच्या वेळी वडील झोपल्यानंतर दोन वाजता उठून त्यांच्याकडे बघा, त्यांच्या पॅन्ट व बनियनला चार जागेवर ठिगळे दिसतील. मात्र तेच वडील तुम्हाला महागड्या वस्तू मात्र आणून देत असतात. या निमित्ताने गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, स्वामी विवेकानंद आदि महापुरुषांचा दैदीप्यमान इतिहासही हंकारे त्यांनी सादर केला.
वसंत हंकारे या महाविद्यालयातील मुलींच्या मनातील हळव्या कोपऱ्याशी बोलत होते. त्यांचे बोलणे मुलींच्या मनाला भिडत होते. यातूनच ही मुले आपल्या आसवांना वाट मोकळी आपल्या भावना व्यक्त करत होते. सावित्री जिजाऊंच्या लेकींनो स्वतःच्या मनाला विचारा स्वतः उपाशी पोटी उघड नागडं वावरत रक्ताचे पाणी करून तुम्हाला शिकवणारा तुमचा बाप समजून घ्या. कॉलेजमध्ये चार मार्क कमी पडले तरी चालतील पण वाघासारख्या आई बापाला आयुष्यात कधीही मान खाली घालायला लावू नका. या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना हंकारे यांनी उपस्थित मुला मुलींना डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला लावले व ‘बाबा मी तुमची मान कधीच खाली होऊ देणार नाही. समाजापुढे तुम्हाला मान खाली घालून वागावे लागेल असे कृत्य मी कधीच करणार नाही’ अशी शपथ घ्यायला लावली. आई बापाला सोडून कोणतीच मुलगी पळून जाणार नाही असा आत्मविश्वास देणारे त्यांचे व्याख्यान होते. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी, बहुसंख्येने आलेला पालक वर्ग वसंत हंकारे यांचे व्याख्यान ऐकून अक्षरश: ढसाढसा रडत होता.
‘संस्कार दिपोभव’ या एकदिवसीय कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. या कार्यशाळेचे व्याख्याते वसंत हंकारे व आयोजक रघुआबा काळदाते यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. संजय नगरकर प्रा. वसंत आरडे, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. सुनील देशमुख, प्रा. अक्षय मंडलिक, प्रा. गणेश बुरटे यांच्यासहित महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकवर्ग व एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.