दादा पाटील महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला महाविद्यालयात संपन्न झाली.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य म्हणाले की, बहि:शाल शिक्षण विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला म्हणजे पाठ्यपुस्तकेतर विविध विषय समजावून घेण्याचे एक चांगले व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘आजचा युवक, सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथील डॉ. हरेश शेळके यांनी गुंफले. डॉ. शेळके यांनी आजच्या युवकांसाठी वाचनाचे महत्त्व काय आहे, सोशल मीडियाचा वापर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कसा करता येईल, तसेच सर्वांगीण विकास विद्यार्थीदशेत कसा करता येईल आदिंविषयी सखोल मार्गदर्शन केले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘हसण्यावर टॅक्स नाही’ या विषयावर अहमदनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार जोशी यांनी गुंफले. याप्रसंगी डॉ. जोशी यांनी हसण्यामुळे जीवनाला गती कशी प्राप्त होते, जीवनाचा सखोल विकास कोणतेही काम हसतमुखाने केले की त्याचा खरा आनंद मिळतो. शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यांनी आहाराचे महत्त्व विशद केले. सदृढ शरीर ही संपत्ती असून नियमित व्यायाम करून प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे असे मतही व्यक्त केले.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘भारतीय लोकशाही’ या विषयावर श्रीगोंदा येथील माजी प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे यांनी गुंफले. त्यांनी लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयी बोलताना, व्यक्ती स्वातंत्र्याची होत चाललेली गळचेपी, लोकशाही विकासाच्या मार्गातील दारिद्र्य व बेरोजगारी असे असणारे प्रमुख अडथळे सांगितले. सदृढ लोकशाहीमुळे लोकांना मिळालेली विकासाची संधी आणि लोकशाही समोरील असलेली आव्हाने अशा विविध पैलूंवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
व्याख्यानमालेतील व्याख्यान सत्रांचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय केंद्र कार्यवाह डॉ. आशा कदम, डॉ. विकास भोसले व डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. दादासाहेब वडावकर, प्रा. गणेश बुरटे, प्रा. स्नेहल गायकवाड यांनी मानले.
व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा.भागवत यादव, यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. भारती काळे, डॉ. प्रतिमा पवार, प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी या व्याख्यानसत्रांचे सूत्रसंचालन केले .