कर्जत शहरात गॅस टाक्याचा स्फोट, बावर इंटरप्राईजेसच्या गॅस गोडाऊन शेजारीच घडली दुर्घटना

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत येथील भारत गॅसच्या गोडाऊन शेजारी अनाधिकृतपणे रिफीलींग करत असताना आग लागून गॅस टाक्याचा स्फोट झाला. प्रत्यक्ष दर्शिनी सात ते आठ टाक्याचा स्फोट झाल्याचे सांगितले. शेजारीचे बावर इंटरप्राईजेसचे असलेल्या गॅस गोडाऊन मध्ये व आवारात शेकडो टाक्या होत्या यातील किती टाक्या भरलेल्या व किती रिकाम्या होत्या हा जरी संशोधनाचा भाग असला तरी या दुर्घटनेत कर्जत शहर व परिसरातील नागरिक बालंबाल बचावले अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर पोलीस व महसूल विभागाने पंचनामा केला मात्र येथील हजारो टाक्या मात्र जप्त केल्या गेल्या नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कर्जत शहरातील बर्गेवाडी रोडवर काल दि १ एप्रील रोजी सायं साडे आठच्या सुमारास गॅस टाक्याचा स्फोट झाला. आग एवढी मोठी होती की दूरवरून आगीचे लोळ दिसत होते व गॅस टाक्या फूटल्याचे आवाज दूरपर्यंत ऐकायला येत होते. सदरची दुर्घटना घडताच काही नागरिकांनी व अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस व महसूल यंत्रणा घटना स्थळी पोहचले, प्रथम घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला तर त्यानंतर मध्यरात्री महसूल विभागाने शेजारी असलेल्या भारत गॅस च्या गोडाऊनचा व समोर उभ्या असलेल्या गाड्या ज्यामध्ये अनेक गॅस टाक्या होत्या त्याचा पंचनामा करण्यात आला. गोडाऊन मध्ये असलेल्या टाक्या कर्मचाऱ्यांनी उचलून दाखवून मोकळ्या असल्याचे दाखवून दिले तर गाड्या मध्ये असलेल्या टाक्या मोकळ्या होत्या की भरलेल्या हे संशयास्पद असताना व त्या टाक्याना सिलचे कागद लटकलेले असताना या टाक्या मोकळ्या असल्याचे पंचनाम्यात म्हटले असून भारत गॅसच्या बावर एन्टरप्रायजेसचे गोडाऊन मध्ये हजारो टाक्या ठेवण्यास परवानगी आहे का? हे पाहून पंचनामा केलेला मुद्देमाल जप्त करणे आवश्यक असताना महसूल विभागाने मात्र या टाक्या जप्त केल्या नाहीत याबाबत प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार गुरू बिराजदार व नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगुळे यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी मुद्देमाल जप्त केला नसल्याची माहिती देताना अधिक माहिती देण्याचे मात्र टाळले. यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या माहिती नुसार सचिन उत्तम लोंढे यांचे राहते घराशेजारील पोल्ट्रिफॉर्म मध्ये रात्री ०८:१५ वाजेपुर्वी भारतगँस गोडाऊन शेजारी खडबडीत गँस टाक्यांची हाताळणी केल्याने सदर ठिकाणी आग लागून आगीमध्ये १२ पुर्ण जळालेल्या गँसटाक्या, २ लहान जळालेल्या गँस टाक्या, ५ सिलेंडर गँस हे स्फोटामध्ये जळालेल्या अवस्थेतील तुटलेल्या गँस टाक्या, पोल्ट्री बाहेर ३ या सर्व टाक्यांमध्ये एच पी कंपनीच्या भरलेल्या गँस टाक्या, ४ ईलेक्ट्रीक मोटार जळालेल्या अवस्थेत, एक जळालेला स्टोव्ह, संसार उपयोगी जळालेल्या अवस्थेतील भांडी व साहीत्य,जळालेल्या अवस्थेतील गहू, स्कुटी गाडी पुर्ण जळून सांगाडा शिल्लक राहीलेला तसेच AVON कंपनीच्या सायकलचा सांगाडा यासोबत पोल्ट्रीफार्मचे पुर्वेकडील भारत गँस गोडाऊनची २ फुट अंतरावरील विटेचे पक्के बांधकाम असलेली भिंत तसेच पत्र्याचे शेड स्फोटामुळे उडालेले व जळालेले अशा अवस्थेत मिळून आले. तसेच आरोपीनी त्यांचे कुटुंबातील सदस्याचे व परीसरातील नागरीकांचे जिवीतास धोका निर्माण होवून होणा-या जिवीत व वित्तहाणीस आपण जबाबदार होवू शकतो याची त्यांना पुर्ण कल्पना असतांना देखील सदरचे कृत्य केले आहे वगैरे मजकूराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर केला असून सचिन उत्तम लोंढे रा बर्गेवाडी व वैभव निकत रा. आंबीजळगाव, या दोघांवर भादवि कलम ४३६,२८६,३३७,३३८,३४, प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या ठिकाणी १२ टाक्याचा स्फोट झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांनी दिली.