कर्जत तालुक्यातील खेड येथे जुगार अड्ड्यावर छापा

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील खेड येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळण्याचे साहित्य व रोकड जप्त करण्यासह ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मनोहर मोरे (४७), अविनाश गोरख साबळे (२६), मंगेश सुदाम कांबळे (५०), अरुण अण्णा सरतापे (३२), धनंजय बळकाराम भोसले (४०), सतीश मनोहर मोरे (४५) सर्व रा. खेड ता. कर्जत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबतची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल तिकटे, नितीन धस हे राशीन पोलीस दूरक्षेत्र येथे असताना, खेड गावाच्या गावकुसाला भिमा नदीच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तात्काळ छापा टाकून त्यांना जागीच पकडले. त्यांच्याकडील जुगार खेळण्याचे साहित्य व हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोखंडे करीत आहेत.