कर्मवीरांचे चरित्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी- इंद्रजीत देशमुख

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त व महाविद्यालयाच्या ‘हीरक महोत्सवी’ वर्षानिमित्त कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये करण्यात आले होते. आजच्या व्याख्यानाचे दुसरे पुष्प माजी कार्यकारी अधिकारी कोल्हापूर व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी गुंफले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर होते आपल्या व्याख्यानामध्ये इंद्रजीत देशमुख यांनी मार्गदर्शनात सांगितले की,
स्वतःसाठी जगणाऱ्या माणसाची तिथी होते मात्र समाजासाठी जगणाऱ्या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. आपल्या जगण्याचा आयाम विस्तारित होण्यासाठी आपण त्यांना ऐकायचं असतं. त्यामुळेच आपल्यात वेगळी क्षमता निर्माण होऊन प्रत्येकाकडे आभाळ कवेत घेण्याची ताकद निर्माण होते. जगात वेगवेगळ्या प्रकारची माणसे असतात. कर्मवीर अण्णांचे जगणे विलक्षण होते. त्यांनी दुसऱ्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे. नेता किंवा अभिनेत्याचा आपल्यावर प्रभाव असण्यापेक्षा कर्मवीरांचा प्रभाव असणं महत्त्वाचं आहे. महापुरुषांची स्वप्न ही स्वतःसाठी नसतात. महापुरुषांची चरित्रे ही व्यापक दृष्टिकोनातून अभ्यासणे गरजेचे आहे. माझ्या अस्तित्वाने दुसऱ्याच्या अस्तित्वाला बाधा येऊ नये अशा प्रकारचे विचार अण्णांनी मांडले. नवा भारत घडवण्यासाठी दोष मुक्त जीवन असावे अशा प्रकारचा आशावाद त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कर्मवीर अण्णांनी जे शिक्षणरुपी रोपटे लावले आहे त्याची आपण फळे आपण भोगत आहोत. आपल्या दादा पाटील महाविद्यालयातील मुले नक्कीच देश पातळीवर झळकतील असा आशावाद व्यक्त केला. मोबाईल मधील काही अनुचित घटना आपले मन विचलित करतात शिवाय त्या आपल्या अभ्यासापासून परावृत्त करू शकतात. त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवाजीराव फाळके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बाळासाहेब साळुंके महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक. शिक्षकेतर सेवक व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार व डॉ. भारती काळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ.प्रमोद परदेशी यांनी मानले