जीवनाला पैलू पाडण्याचे काम श्रमसंस्कार शिबिरातून होते… तहसिलदार गणेश जगदाळे

कर्जत (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘हीरक महोत्सवी विशेष श्रमसंस्कार शिबिर’ मौजे कोळवडी या गावी संपन्न होत आहे. ‘युवकांचा ध्यास, ग्राम, शहरविकास लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती’ या संकल्पनेला अनुसरून शिबिर कालावधीमध्ये ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती व आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, महिला जनजागृती, ग्रामीण भागातील युवकांची भूमिका, पर्यावरण रक्षण व जागृती, जलसंवर्धन, प्रबोधनपर पथनाट्य, वृक्षारोपण, ग्राम सर्वेक्षण आदि उपक्रम राबविले जाणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटन कर्जतचे तहसिलदार मा. गणेश जगदाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर कोळवडी ग्रामस्थ युवराज खानवटे, राहुल नवले, क्षीरसागर सर, सोमनाथ डमरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. संजय ठुबे, प्रा. भागवत यादव, डॉ. संदीप पै आदी मान्यवर, कोळवडी ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकवर्ग, शिबिरार्थी शंभर एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते
यावेळी तहसिलदार गणेश जगदाळे यांनी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. श्रमसंस्कार शिबिरे ही जीवनाला पैलू पाडण्याचे काम करीत असतात, त्यामुळे शिबिराचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी शिबिराच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, एन.एस.एस.ची बांधणी युवकांना सामोरे ठेवून केली आहे. ‘देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे’ ही बा. भ. बोरकर यांची कविता कथन करून नवनिर्मितीचे डोहाळे एन.एस.एस स्वयंसेवकांना लागले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तरुणांच्या ओठांवरील गाणी आणि हातातील पुस्तक यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते. ‘माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी’ हे या योजनेचे बोधवाक्य शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी कृतीत आणावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन एन.एस.एस स्वयंसेविका कु. साक्षी रजपूत हिने केले. शिबिराचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. वाल्मीक कापसे यांनी तर आभार डॉ. प्रतिमा पवार यांनी मानले.
सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास रोडगे, डॉ. वाल्मीक कापसे, प्रा. बलभीम महारनवर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय विकास समितीने सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.