शिक्षणातील बदलते प्रवाह विद्यार्थ्यांनी स्वीकारले पाहिजेत : मा. संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात ‘दलित मित्र दादा पाटील’ यांची ३२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त दादा पाटील यांच्यावरील लघु वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री संपत सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी शिक्षण देणारी व्यवस्था असल्याचे सांगितले. शालेय जीवनात लढण्याची प्रेरणा मिळते आणि त्यातूनच पुढे नाविन्याचा जन्म होतो. नवनवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी बदलत्या शिक्षण पद्धतीचा उपयोग करून घ्या. बदलत्या शिक्षण पद्धतीबरोबर आपणही बदलले पाहिजे. डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. योग्यवेळी योग्य गोष्ट केली पाहिजे. झोकून देऊन प्रयत्न करा व आवडत्या क्षेत्रात करिअर घडवा. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. वाहत्या पाण्यासारखे प्रवाहित राहा म्हणजे कुठे ना कुठे संधी मिळेल. योग्य वेळेला योग्य गोष्टच केली पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी इतर राज्यात इयत्ता सहावी पासून करतात म्हणून त्या राज्यातील मुले प्रशासनात संख्येने जास्त आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा. कितीही मोठे झालोत तरी आपला पहिला प्रणाम शिक्षकांना असणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
पुणे विभागाचे विभागीय उपसंचालक मा. राजेंद्र अहिरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रशासनात यायचे असेल तर प्रयत्न करण्याची तयारी ठेवावी लागेल. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या करिअरसाठी करा. मुलांचा सध्याचा कल विज्ञान-तंत्रज्ञाकडे जास्त झुकलेला दिसतो. तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करियर करून उच्च शिखरावर पोहोचण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. याप्रसंगी प्रा.भास्कर मोरे, माजी सभापती किरण पाटील यांनी दादा पाटील यांच्या जीवनकार्याचा पट उपस्थितांसमोर अधोरेखित केला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सतीश सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, प्राचार्य डॉ. संतोष भंडारी, दादा पाटील यांच्या कुटुंबियांमधील किरण पाटील, सतीश पाटील, श्रीराम पाटील, शहाजी पाटील, श्रीमती निर्मलाताई पाटील, सचिन पाटील तसेच कैलास काळे, हिरामण नवले, बापूराव शिंगाडे , बाबासाहेब खुरंगे, पूजा सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, डॉ. अस्मिता सूर्यवंशी, सायली सूर्यवंशी सुभाषचंद्र तनपुरे, माजी प्राचार्य भानुदास नेटके, सुंदरदास चव्हाण, बागल सर, चौरे सर, सकट सर आदि मान्यवर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. सुनील देशमुख यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका श्रीमती इर्शाद पठाण यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार व प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले.