दादा पाटील महाविद्यालयात ‘सर मॅडम सिरीअल’चे महाऑडिशन संपन्न.

कर्जत (प्रतिनिधी) :- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कला, अभिनय क्षेत्रात संधी मिळावी या हेतूने ‘सर मॅडम’ सिरीअल’ च्या ऑडिशनचे आयोजन रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने या ऑडिशनचे आयोजन केले होते.
या ऑडिशनसाठी महाराष्ट्रात ‘छोटा पुढारी’ म्हणून ख्याती असणारे घनश्याम दरवडे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे व ऋषी शेलार यांचीही उपस्थिती लक्ष वेधणारी होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी सांगितले की, कला ही माणसाला समृद्ध करते, मानवी संवेदना जागवून माणसाला माणूस बनवण्याची ताकद कलेतच असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली. शिवाय विद्यार्थ्यांसाठी कलाक्षेत्रात असणाऱ्या भविष्यकालीन संधींचा ऊहापोहही केला.
सदर ऑडिशनच्या माध्यमातून दादा पाटील महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना विविध मालिका,चित्रपट व वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. आभार प्रा. राम काळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रशांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ संजय ठुबे, प्रा. भागवत यादव, प्रा. मोहनराव खंडागळे, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. प्रकाश धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.