शुक्रवारी कर्जतमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांचा मेळावा, पुरस्कार वितरण
खा. संजय राऊत काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष

कर्जत (प्रतिनिधी):- मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. आमदार रोहीत पवार कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख अध्यक्षपद भूषविणार आहेत. कर्जत येथील कार्यक्रमाच्या तयारी साठी कर्जत मधील पत्रकारांनी बैठक घेऊन नगर सह राज्यातील संघटनेच्या पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून अंतिम आढावा घेतला.
राज्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी शानदार सोहळ्यात गौरविण्यात येते. परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले स्व. वसंतराव काणे आणि स्व. रंगाण्णा वैद्य यांच्या नावे हे पुरस्कार दिले जातात. गेल्या वर्षी हा सोहळा परभणी जिल्ह्यात गंगाखेड येथे संपन्न झाला होता. यावर्षी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे हा सोहळा होत आहे. सकाळी १० वाजता शारदाबाई पवार सभागृहात सोहळा संपन्न होनार आहे. या कार्यक्रमास “सामना” चे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्यभरातून ७०० ते ८०० पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. सध्या देशात माध्यमांची होत असलेली मुस्कटदाबी, महाराष्ट्रात पत्रकारांवरील वाढते हल्ले, सत्तेच्या जवळच्या लोकांकडून पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या, आणि राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्त्या या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत माध्यमांबाबत काय बोलणार? कोणते राजकीय भाष्य करतात, कोणावर तोफ डागतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.. मुख्य कार्यक्रमानंतर संजय राऊत यांची राजकीय प्रतिनिधी संजय मिस्कीन मुलाखत घेणार आहेत. ही रोखठोक मुलाखत उपस्थित पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे.
आपल्या मित्रांच्या कार्याचं कौतूक होत असताना सर्व पत्रकार मित्रांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला संघटक शोभा जयपूरकर, पुणे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, जिल्हा अध्यक्ष सुभाष गुंदेचा, दक्षिण नगर अध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर अध्यक्ष अमोल वैद्य, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, संयोजन समिती अध्यक्ष गणेश जेवरे, संयोजन समिती उपाध्यक्ष आशिष बोरा, योगेश गांगर्डे, आदिंनी केले आहे.
कर्जत मधील संयोजन समितीने विविध समित्या नियुक्त केलेल्या असून या सर्वाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संपादक व नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, डॉ अफरोज पठाण, सुभाष माळवे, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, मुन्ना पठाण, निलेश दिवटे, दिलीप अनारसे, अस्लम पठाण, विनायक ढवळे, नानासाहेब साबळे, आदी सह तालुक्यातील सर्वच पत्रकार नियोजनात सक्रिय आहेत.