
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथे येथे अंबादास पिसाळ मित्र मंडळाचे वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील छोट्यातील छोटा आणि मोठ्यातील मोठा सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती धडकी भरविणारी होती. कार्यक्रमाच्या सुरुवातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मागील राजकीय घडामोडीवर भाष्य केले. ते म्हणाले, मी आणि अंबादास पिसाळ अनेक निवडणुकीत परस्परविरोधी निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलो. कधी मी विजयी, कधी ते विजयी झाले मात्र मनात कटुता ठेवली नाही. २००९ ला मतदारसंघ खुला झाला आणि अनेकांच्या महत्वाकांक्षा जागृत होत राम शिंदे आमदार झाले. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक असून कधीच वाढदिवस साजरा न करणारे पिसाळ यांनी यावेळी साजरा करण्याचे गुपित काय? तुम्हाला शुभेच्छा आहेत, असे म्हणत राजकीय चर्चेला वाट मोकळी केली.
तोच धागा पकडत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांनी पिसाळांवर स्तुतीसुमने उधळत आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पिसाळ निष्ठावंत आणि प्रामाणिक असून त्यांचा मोठा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे. मात्र त्यांनी निवृत्तीचा विचार करावा, असे म्हणत डिवचले. त्यावर अंबादास पिसाळ यांनी मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मनात सर्वांच्याच महत्वाकांक्षा आणि स्वप्न असतात. माझी नाळ सर्वसामान्यांशी असून त्यांच्या कामासाठी झटत असतो. आगामी काळात पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो पाळला जाईल असे सांगितले.
त्यावर आमदार प्रा. राम शिंदे यांनी झालेल्या टीका टिपण्णीवर म्हणाले, पिसाळ यांचे कार्य अत्यंत चांगले असून भाजपा प्रामाणिक आणि निष्ठावंताना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संधी देतो, असे म्हणत शुभेच्छा दिल्या. यावेळी दयानंद महाराज कोरेगावकर, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, शांतीलाल कोपनर, सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, अभय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने अंबादास पिसाळ यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. आधीही मोठा उहापोह न करणाऱ्या पिसाळांची नेमकं हेच टायमिंग का साधलं ? यामागचे गुपित काय? याबाबत राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.