
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द गावचे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह ११ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला. नव्याने हजर झालेले कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी ही कारवाई केली आहे. दि. ५ रोजी सकाळी कर्जतचे
उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा राक्षसवाडी खुर्द शिवारात वाळू घेऊन चालला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक वाखारे यांनी तात्काळ पथकासह त्या शिवारात जाऊन श्रीगोंदा रस्त्यावर कोपर्डी फाट्यावर एमएच ४२, एक्यू ६८९१ या हायवा ४ ब्रास वाळूसह घेतला.
या वाहनाचा चालक पळून गेला असून वाहन वाळूसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे, पोलीस नाईक रवींद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव हे सहभागी झाले होते.