कर्जत शहरात अवैध दारू विक्रीवर ‘उत्पादन शुल्क’ च्या विशेष पथकाद्वारे होणार कारवाई

कर्जत प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यात अवैध पद्धतीने बनावट दारू,हातभट्टी व विनापरवाना दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क नगर विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी विशेष पथकांची निर्मिती केली असून, संपूर्ण कर्जत शहरात कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी,बनावट दारू, विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री व हातभट्टी अड्डयांची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. कर्जत तालुक्यात बनावट , विनापरवाना हातभट्टी निर्मिती व विक्री सुरू असलेले दहा हॉटस्पॉट शोधून काढण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक पथकाला टार्गेट देण्यात आले आहे. या हॉटस्पॉटचे रेड, ऑरेंज आणि येलो अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे. रेडमध्ये जास्त तीव्रता, ऑरेंजमध्ये कमी तीव्रता, तर येलो मध्ये गंभीर नसलेल्या हॉटस्पॉटची विभागणी केलेली आहे. हे सर्व हॉटस्पॉट ग्रीन म्हणजेच विनापरवाना, हातभट्टीच्या अनुयांचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
कर्जत शहर बनावट , विनापरवाना दारूमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हॉटस्पॉट शोधून टार्गेट ठरविण्यात आले आहे. दोन पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक विभागात कारवाई सुरू आहे.
त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे विभाग आहेत. त्यानुसार त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अवैध मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आहेत. मात्र अनेकदा स्थानिक विभागातील पथकाकडून कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अधीक्षकांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. तर, विभागाच्या पथकांनादेखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जर कारवाईत टाळाटाळ केली, तर गंभीर दखल घेण्याचा इशारा अधीक्षकांनी दिला आहे.