कर्जतच्या गोकुळ शिंदेच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण: नगर मध्ये सोय झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा

कर्जत (प्रतिनिधी) :- किडनी प्रत्यारोपण ही प्रक्रिया मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण करणारी नसून याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, रुग्णाच्या व नातेवाईकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी नगर येथील
मेडप्लस अहमदनगर अपेक्स मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ञ डॉ साईप्रसाद शिंदे यांनी कर्जत येथील केशर हॉस्पिटल येथे जनजागृती अभियान राबवत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कर्जत येथील गोकुळ शिंदे यांच्या किडनीचे नुकतेच प्रत्यारोपण डॉ मेडप्लस अहमदनगर अपेक्स मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ञ डॉ साईप्रसाद शिंदे यांनी नगर येथे केले. त्यांना त्याच्या पत्नी कविता शिंदे यांनी आपली किडनी दिली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गोकुळ शिंदे यांनी डॉ शिंदे यांचे आभार मानताना आपल्या मनातील भीती त्यांनी काढली व अत्यंत चांगली वागणूक देत योग्य प्रकारे उपचार केल्यामुळेच आपण आज चालू फिरू शकतो असे सांगत त्यांना पुष्पगुच्छ देत आभार मानले.
यावेळी डॉ शिंदे यांनी बोलताना रुग्ण व्यवस्थित करणे प्रत्येक वैद्यक क्षेत्रातील व्यक्तीचे कर्तव्य असून तो आनंदी होत सुखरूप घरी जातो यातच खूप मोठे समाधान आहे. किडनी विकार असलेल्या रुग्णासह किडनी देणाऱ्या व्यक्तीस कसलाच धोका नाही, याबाबत समाजात गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात असे प्रतिपादन डॉ साईप्रसाद शिंदे यांनी व्यक्त करताना
कर्जत येथील गोकुळ शिंदे आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करण्यात आले. या दाम्पत्यानी किडनी प्रत्यारोपण करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ही सोय नगर मध्ये झाल्याने सर्व सामान्य कुटुंबाला याचा फायदा होणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकणारे पुणे मुंबई व इतर कोठेही जाऊ शकतात मात्र सर्वसामान्य कुटुंब कोठे जाणार या सर्वासाठी विखे फाऊंडेशनच्या हॉस्पिटलला किडनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी मिळालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी बोलताना कर्जत सारख्या ग्रामीण भागात डॉ साईप्रसाद शिंदे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी कर्जतसाठी उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ गरजू रुग्णानी घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशर हॉस्पिटलचे संचालक डॉ सुरेंद्र जवणे यांनी केले. तर आभार मेडप्लस अपेक्स हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रामदास शेवाळे यांनी मानले. यावेळी आंबीजळगावचे सरपंच विलास निकत, संभाजी अनारसे, मनोज अनारसे, गोकुळ शिंदे, कविता शिंदे आदी उपस्थित होते. कर्जतमधील किडनी विकारांवर उपचार घेतलेले, व या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण उपस्थित होते.