महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आयोजित ‘दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३’ या काळात जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १३ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी ‘महात्मा ते महामानव’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरचे डॉ. महेबूब सय्यद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. तसेच या व्याख्यानाला महाविद्यालयाचे सर्व शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. महेबूब सय्यद यांनी मानव मुक्तीचे ध्येय शिक्षणातून पूर्ण होते, शिक्षणानेच उन्नती होत असल्याचे सांगितले. आधुनिक भारताच्या प्रबोधनाची पहाट महात्मा फुलेंच्या विचारातून जाते. शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे दिले पाहिजे अशी धारणा महात्मा फुलेंची होती. महात्मा फुलेंनी महिलांसाठी केलेले कार्य महत्वपूर्ण आहे. त्या काळातील विधवा महिलांसाठी आश्रम काढले. अनेकांच्या सहकार्यातून, समाज उन्नतीसाठी शाळा सुरू केल्या. राज्यातील उत्पन्नाचा जास्त हिस्सा शिक्षणावरती खर्च झाला पाहिजे हा विचार जाणणारे राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समाजासमोर मांडले.
अर्थशास्त्र शिकल्याशिवाय आर्थिक उन्नती होणार नाही हे डॉ. आंबेडकर यांनी जाणले होते. धर्मग्रंथांनी माणसा माणसांमध्ये भेद, विषमता निर्माण केली होती, म्हणूनच येवला येथे मी ‘हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून मरणार नाही’ असा निर्धार व्यक्त केला. पुढे २१ वर्षे त्यांनी विविध धर्मग्रंथांचा अभ्यासही केला. समाजाच्या उन्नतीसाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही नियतकालिके काढली. डॉ.आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली, मसुदा समितीचे अध्यक्ष पदही सांभाळले. त्यातूनच ‘एक व्यक्ती एक मत’ हे धोरण राबवले. ज्यांची मक्तेदारी मोडीत काढली होती तेच लोक आज भारतीय राज्यघटनेला नावे ठेवत आहेत, असे डॉ. महेबुब सय्यद यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी ‘समर्पणता’ किती महत्वाची असते हे विशद केले.
क्रांतीला प्रतिक्रांतीने मारण्याचा प्रयत्न पूर्वीपासून होत आलेला आहे. समाजसुधारकांनी जी क्रांती केली त्याला दाबण्याचा प्रयत्न प्रतिगामी लोकांकडून नेहमी झालेला आहे. पूर्वी राजा हा राजघराण्यातून जन्माला यावा लागायचा, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे, लोकशाही समाज व्यवस्थेमुळे राज्यकारभार करणारा प्रमुख हा मत पेटीतून उदयाला येत आहे. कल्याणकारी राज्य राबविणारे महाराष्ट्रामध्ये दोन राजे होऊन गेले, त्यामध्ये छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराज हे होत. पुस्तक माणसाचे मस्त घडवतात म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी मैत्री करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले.
व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. प्रमोद परदेशी व इतर सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. व्याख्यान सत्राचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले