महिला-मुलींच्या निर्भयतेसाठी पोलीस निरीक्षक पोहोचले विद्यालयात!
_तीन विद्यालयातील विद्यार्थिनींशी मुक्त संवाद; 'बांधिलकी नारी सन्मानाची' पुस्तकाचे वाटप_

कर्जत (प्रतिनिधी) :- महिला-मुलींवर होणारे अत्याचार व त्यांना ओळख व अनोळखी व्यक्तींकडून होणारा त्रास रोखण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांना अभय व निर्भय केले आहे.
पोलीस निरीक्षक यादव यांनी नुकतीच तालुक्यातील राशीन येथील हशु अडवाणी विद्यालय व जगदंबा विद्यालय तसेच खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व डॉ. ग. दा. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालयास भेटी देऊन तेथील हजारो विद्यार्थिनींशी मुक्तसंवाद साधला.यावेळी महिला मुलींना कायद्याचे ज्ञान मिळावे व आपत्कालीन अडचणींशी कसा सामना करावा?यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘बांधिलकी नारी सन्मानाची’ या पुस्तकाचे सर्व विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यर्थिनींनी मनसोक्त संवाद साधत आपल्या अडचणी पोलीस निरीक्षक यादव यांना सांगितल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले,’कुठल्याही मुलीला कुणी त्रास देत असेल तर न घाबरता कर्जत पोलिसांशी संपर्क साधा.प्रत्येक शाळा महाविद्यालयात व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचे मोबाईल क्रमांक तसेच टोल फ्री क्रमांक लावलेले फलक लावण्यात आले आहेत. कुणाचेही नाव जाहीर केले जाणार नाही. मुलींनी निर्भीड व सक्षम बनावे. कुणालाही भिण्याची गरज नाही’ शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक आदींनीही आपले मनोगत व्यक्त करून पोलिस बांधवांकडून होत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले. कर्जत पोलीस महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी घेत असलेल्या पुढाकाराने अनेक घटना टळत आहेत हे आवर्जून सांगितले.