छत्रपती शिवाजी महाराज जयंती सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी
कर्जत शहरात निघाली भव्य मिरवणूक

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत शहर आणि तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ शिवप्रतिमेचे पूजन प्रमुख समन्वयक वैभव लाळगे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह राजमाता जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींच्या हस्ते करण्यात आले. यासह भव्य अश्वारूढ शिवप्रतिमेस ही हार घालण्यात आला. यावेळी अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी शिवजयंती उत्सवानिम्मित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला होता. शिवजयंती निम्मित कर्जत बसस्थानक परिसर भगवामय झाला होता. यावेळी शालेय विद्यार्थिनीनी शिववंदना म्हटली. तर जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी महाराष्ट्र गीत, शिवराय पाळणा गायला आणि मराठ-मोळ्या गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. कर्जत तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर प्रवेशद्वार याठिकाणी शिवजयंती निमित्त अजय भैलुमे मित्रमंडळ वतीने पूजन करण्यात आले.
दादा पाटील महाविद्यालयात छ. शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. तर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये ही पूजन करण्यात आले.
सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने मागील सात दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिम्मित विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. यासाठी सिनथडी या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मल्लखांब प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, चित्रकला स्पर्धा झाली तर पोवाद्याचा व जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रमही संपन्न झाला. याठिकाणी अनेक व्यवसाईकानी आपल्या व्यवसायाच स्टॉल लावले होते. कर्जत करांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.
आ. रोहित पवार व आमदार राम शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यांनी महाराजांचे पूजन केले यावेळी आमदार रोहित पवार यांच्या डोक्यावर हत्तीने सोंड ठेवत दिलेला आशिर्वाद व आमदार प्रा राम शिंदे यांनी मिरवणुकीत वाजवलेला तालासुरातील ढोल विशेष चर्चेत आला.
कर्जत शहरात सायंकाळी मुख्य रस्त्यावरून भव्य अश्वारूढ छ. शिवाजी महाराजाची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अनेक झांज पथक, बँड पथक, लेझिम पथक यासह हत्ती, घोडे, उंट मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले, मर्दानी खेळ दाखवणारे पथक सहभागी झाले होते त्याच्या चित्त थरारक कसरतीनी अनेकांनी त्याचे कौतुक केले. आकर्षक रोषणाईत दुतर्फा भगव्या झेंड्याच्या सजावटीत छ. शिवाजी महाराजाच्या जयजयकाराने परिसर शिवमय झाला होता. यावेळी युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.