नॅकचा अ++ दर्जा मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्यावतीने दादा पाटील महाविद्यालयाचा सन्मान.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात बाजी मारली असून अ ++ श्रेणी प्राप्त करीत असताना ३.७१ सीजीपीए घेऊन आजच्या घडीला भारतात सहावा क्रमांक तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दादा पाटील महाविद्यालयाला नॅकची अ++ ग्रेड मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब, व्हॉइस चेअरमन मा. भगीरथकाका शिंदे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. रामशेठ ठाकूर साहेब, मा. मीनाताई जगधने तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख साहेब, सहसचिव मा. प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के साहेब यांच्यावतीने दादा पाटील महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. संजय नगरकर साहेब यांचा संस्थेच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
दादा पाटील महाविद्यालय यावर्षी हीरक महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने नॅक कडून महाविद्यालयाला मिळालेले हे यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
दादा पाटील महाविद्यालयाला नॅकच्या चौथ्या फेरीच्या मूल्यांकनासाठी दिनांक १७ व १८ ऑगस्ट २०२३ रोजी नॅक चेअरमन म्हणून उत्तराखंड येथील एच. एन. गढवाल विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. देवेंद्रसिंग नेगी, प्रमुख समन्वयक म्हणून सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हरियाणाचे प्राध्यापक डॉ. संजीव कुमार व सदस्य म्हणून केरळ येथील इव्हेनियस कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. के. आय. जॉर्जी या नॅक पिअर टीमने भेट देऊन नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाचे बदललेले स्वरूप व गुणात्मक दर्जा याची तपासणी केली होती.