भारत गॅस गोडाऊन थोरात वस्तीतून हलवणे व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करणे अन्यथा अमरण उपोषण ; नामदेव थोरात

कर्जत (प्रतिनिधी) कर्जत बर्गेवाडी रोडवर थोरात वस्ती परिसरात असलेले भारत गॅसचे धोकादायक गोडाऊन लोकवस्तीतून अन्य ठिकाणी हलवावे अशी मागणी थोरात वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव थोरात यांनी केली आहे. या मागणीसाठी बारा एप्रिल पासुन कर्जत तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. कर्जत बर्गेवाडी रोडवर थोरात वस्ती परिसरात भारत गॅसचे गोडाऊन आहे. शेजारीच गॅसचा बेकायदेशीर रिफीलिंग चा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे, ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे अशा ठिकाणी असे गोडाऊन चालू ठेवता येत नाही. मात्र महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरु तसेच येथील बेकायदेशीर रिफीलिंग
सेंटरला भारत गॅसचे मॅनेजर गणेश नलवडे यांचा वरदहस्त आहे. थोरात वस्ती येथील भारत गॅसचे गोडाऊन लोकवस्तीतून अन्य ठिकाणी हलवावे यासाठी थोरात वस्ती येथील रहिवाशांनी जानेवारी 2024 मध्ये तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले होते. मात्र या मागणीकडे तहसील कार्यालयाने
दुर्लक्ष केले, एक एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भारत गॅसच्या गोडाऊन शेजारी अवैधरीत्या सुरु असलेल्या रिफीलिंग सेंटर मध्ये १९ गॅसच्या टाक्यांचे स्फोट झाले, दोघे जण जखमी झाले, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही, यामुळे परिसर हादरला, तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली, एवढी गंभीर
घटना घडली तरी देखील महसूल व पोलीस प्रशासनाने याला गांभीर्याने घेतले नाही, सदोष पंचनामे केले, घटनास्थळी असलेले साहीत्य जप्त केले नाही, येथील रहिवासी जीव मुठीत धरून जगत आहेत, बावर एन्टरप्राईज जामखेड यांचे कर्जत येथे कर्जत बर्गेवाडी रोडवर गोडाऊन आहे, याची मुदत संपली आहे, याबाबत महसूल विभागाला माहिती विचारली असता या बाबत त्यांना उत्तर देता आले नाही. याबाबत आवाज उठवत असलेल्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत. येथील रहिवासी भयभीत झाले आहेत, या भारत गॅस गोडाऊनचे मॅनेजर गणेश नलवडे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, हे गोडाऊन हलवावे या मागणीसाठी थोरात वस्ती येथील रहिवासी मुला बाळांसह आमरण उपोषणास बसणार आहेत, या प्रकरणात काही घडले तर याला प्रशासन जबाबदार राहील असे नामदेव थोरात यांनी सांगितले.