कर्जत तालुक्यातील शिंदा येथे झाडाचा वाढदिवस साजरा

कर्जत : ग्रामीण भागात हिंदू – मुस्लिम अत्यंत गुण्या गोविंदाने राहत असून, कर्जत तालुक्यातील शिंदा येथे सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमप्रेमींनी मुस्लिम मशिदीसमोर व कब्रस्थानाभोवती वृक्षारोपण करून जातीय सलोखा जोपासला तर १ जून सामूहिक वाढदिवशी एकत्रित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कर्जत शहरात सुरू असलेल्या श्रमदानाच्या सलग १३३९ दिवशी १ जून रोजी तालुक्यातील शिंदा, या गावात श्रमदान करण्यात आले. एक वर्षापूर्वी येथे श्रमदान करून लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस करण्यासाठी आज सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमप्रेमींचे श्रमदान येथे आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त येथील मुस्लिम मशिदीसमोर व मुस्लिम कब्रस्तानाभोवती वृक्षारोपण करण्यात आले तर गावातील रस्त्याच्या बाजूलाही वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत समोर एका वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या झाडाला फेटा बांधून या झाडाचा वाढदिवस या वेळी साजरा करण्यात आला तर एक जून या दिवशी अनेकांचा वाढदिवस असतो, अशा सर्व श्रमप्रेमींचा शिंदा ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सत्कार करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी श्रमप्रेमींच्या वतीने बोलताना शिंदा गावात ही चळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांनी वेशित दुतर्फा उभे राहून श्रमप्रेमींचे टाळ्या वाजवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले.