कर्मवीर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती निमित्त कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व सौ. सो. ना. सोनमाळी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने, दादा पाटील महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त, सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता कर्मवीर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात येईल तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेची कर्जत शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या शोभायात्रेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे यांच्या हस्ते होईल. याच दिवशी वेशभूषा स्पर्धा व श्रमप्रतिष्ठा दिन साजरा करण्यात येणार आहे. श्रमप्रतिष्ठा दिनानिमित्त कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
२३ सप्टेंबर रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम एन. एस. एस विभागाच्या वतीने आयोजित केलेला आहे याच दिवशी पालक मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते होईल.
सोमवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी ‘कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शनाचे’ उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी उसदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ यांच्या हस्ते होईल. सदर दिवशी सकाळी १० वाजता ‘स्पर्धा परीक्षा: स्वरूप व संधी’ या विषयावर कर्मवीर विद्या प्रबोधिनीचेे केंद्र संचालक प्रा. अजित पाटील यांचे व्याख्यान दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये संपन्न होईल. सदर दिवशी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन कलाशिक्षक सुनील भोसले यांच्या हस्ते होईल. तसेच दुपारी १२ वाजता ‘आयडियाचा अविष्कार संशोधन स्पर्धा’ घेण्यात येणार आहेत, त्याचे उद्घाटन संशोधक मुकुंद पोंदे यांच्या हस्ते होईल.
मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कलाशिक्षक मजहर सय्यद यांच्या हस्ते संपन्न होईल.
२७ सप्टेंबर रोजी ‘कर्मवीर: आजच्या संदर्भात’ या विषयावर माजी कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर असतील. दुपारच्या सत्रामध्ये ‘सन्मान कर्मयोद्धांचा’ हा कार्यक्रम आयोजित केलेला असून या कार्यक्रमाचे उद्घाटक व व्याख्याते म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके असतील.
शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी ‘चला यशस्वी होऊया’ या विषयावर दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक मा. यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान संपन्न होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे असतील.
कर्मवीर जयंती सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राचार्य राजकुमार चौरे, मुख्याध्यापिका श्रीमती इर्शाद पठाण, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी व सांस्कृतिक विभागाच्या समन्वयकांनी केलेले आहे.