दादा पाटील महाविद्यालयात दिवाळी फराळ व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन.

कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत शहरातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयामध्ये हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘दिवाळी फराळ व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे’ आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आलेले आहे
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात आजवर अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व दलित मित्र दादा पाटील यांच्या विचारांचे संस्कार आपण सर्वांनी घेतले. अशा आपल्या हक्काच्या या महाविद्यालयात सर्व माजी विद्यार्थ्यांचे ‘दिवाळी फराळ व स्नेह मेळाव्याच्या’ निमित्ताने महाविद्यालयामार्फत स्वागत केले जाणार आहे.
सर्व माजी विद्यार्थ्यांना सध्याचे महाविद्यालयाचे बदललेले रूप पाहता येईल. शिवाय गतकालीन आठवणींना उजाळा मिळेल, आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना भेटून हितगुज करता येईल हा उद्देश या स्नेह मेळाव्याचा आहे.
दादा पाटील महाविद्यालयाने नुकतेच नॅकचे अ प्लस प्लस मानांकन प्राप्त करून देशात सहावे, महाराष्ट्रात तिसरे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाचे गुणांकन प्राप्त केले आहे. या मानांकनामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा होता. म्हणूनच नॅकच्या अ प्लस प्लस मानांकनातील आपल्या सहभागाचे कौतुक व्हावे याकरिता सालाबादप्रमाणे ‘दिवाळी फराळ व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे’ आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
दादा पाटील महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी ‘दिवाळी फराळ व स्नेह मेळाव्यास’ मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्नेह वृद्धिगत करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, कार्याध्यक्ष सुनील शेलार, उपाध्यक्ष ऋषिकेश धांडे, अमित तोरडमल, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे, समन्वयक डॉ. संजय ठुबे, माजी अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व आजी व माजी विद्यार्थी संघ यांच्याकडून करण्यात आले आहे