दादा पाटील महाविद्यालयात ‘लेखन कौशल्य’ कार्यशाळा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांकरिता ‘कर्मज्योती- हिरकणी विशेषांक- वार्षिक नियतकालिक २०२३-२४’ करिता’ ‘हिरकणी- मी आणि माझी जडणघडण’ या विषयावर लेखन करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता ‘लेखन कार्यशाळा’ बुधवार दि. २० मार्च २०२४ रोजी महाविद्यालयातील हॉल नंबर १६ मध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर व मा. राहुल धनावडे यांनी मार्गदर्शन केले.
दादा पाटील महाविद्यालयाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘हिरकणी- मी आणि माझी जडणघडण’ या नावाने स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्मरणिकेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले अनुभव मांडण्यासाठी काही विषय देण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘माझ्या जडणघडणीत दादा पाटील महाविद्यालयाचा वाटा, दादा पाटील महाविद्यालयात मी कसा घडलो, दादा पाटील महाविद्यालयाचे माझ्या जीवनातील स्थान, दादा पाटील महाविद्यालय: एक संस्कार केंद्र, दादा पाटील महाविद्यालयातील माझे अनुभवकथन आदि विषयावर ५०० ते १००० शब्दात आपले अनुभवकथन लिहिण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. त्याकरिताच महाविद्यालयाच्या वतीने ‘लेखन कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी ‘कर्मज्योती’ नियतकालिकासाठी लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ‘मी कोण आहे, मी आज कोठे आहे, माझ्या आयुष्यातील तीन अविस्मरणीय घटना, माझ्या आयुष्याला वळण देणाऱ्या अथवा संस्कार देणाऱ्या पाच प्रभावी व्यक्ती’ अशा प्रश्नांना अनुसरून कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना लिहायला सांगितले. मा. राहुल धनावडे यांनी स्वतःचा खडतर जीवनप्रवास सांगताना विद्यार्थ्यांना सर्व पातळीवरील संघर्ष करून यशस्वी होण्याचे आवाहन केले.
सदर लेखन कार्यशाळेमध्येच विद्यार्थ्यांकडून ‘मी आणि माझी जडणघडण’ या विषयावर लिहून घेतले गेले. एकूण १६५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये स्वतःचे अनुभवकथन लेखनरूपाने लिहिले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी तर आभार संपादक प्रा. सुखदेव कोल्हे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. भारती काळे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ‘कर्मज्योती’ नियतकालिकाचे सर्व विभागीय संपादक व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष सहकार्य केले.