आमदार रोहित पवार यांच्या कृतीतून दुष्काळाने त्रासलेल्या नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा

कर्जत-जामखेड तालुक्यात आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत जामखेड तालुक्यात उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणी टंचाईची समस्या निर्माण झालीय. जेव्हा जेव्हा पाणी टंचाई जाणवली रोहित पवार यांनी शासकीय मदतीची वाट न बघता टँकर सुरू केले आहेत. गेल्या साडेचार वर्षात जिथे कुठे टँकरची गरज पडलीय तिथं टँकर देण्याचं काम रोहितदादा पवारांनी केलंय आणि आताही देत आहेत, असे आ. पवार यांच्या संपर्क कार्यालयातून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे, आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जत- जामखेड मतदारसंघात १४० गावांमध्ये १९४ पाण्याचे टँकरे देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे २४ हजार ६५१ कुटुंबांना आणि जवळपास ९७ हजार ६२० रहिवाशांना स्वच्छ आणि आवश्यक पाणी उपलब्ध झाले आहे. कर्जत तालुक्यात ६८ गावांमध्ये ११ हजार ९४५ कुटुंबियांना तर जामखेडमध्ये सुमारे ७२ गावांमध्ये १२ हजार ९४५ कुटुबियांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयात वेगळा पाणीटंचाई कक्ष स्थापण करण्यात आला असून ग्रामस्थांनी मागणी केल्यास त्याची तातडीने दखल घेऊन त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिथे कुठे नागरिकांना पाण्याची अडचण आहे त्याठीकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.