दादा पाटील महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जतच्या भूमीला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते. कर्जतच्या मातीमध्ये आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. कर्जतच्या मातीमध्ये खेळाडू घडवण्याचा गुणधर्म आहे, याचाच प्रत्यय म्हणून नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या मास रेसलिंग स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, तीन विद्यार्थ्यांनी रजत पदक, व दोन विद्यार्थ्यांनी ब्रॉंझपदाची कमाई केली. या विद्यार्थ्यांची रशिया या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मांस रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशिवाय ‘महाराष्ट्राची चॅम्पियनशिप’ दादा पाटील महाविद्यालयाने मिळवली आहे.
कुस्ती, कबड्डी या खेळामध्ये सुवर्णपदक, रौप्यपदक व ब्रॉंझपदक मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. यामध्ये ऋतुजा बर्डे (गोल्ड मेडल), ऋतिका बर्डे (गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉंझ पदक), प्रतीक्षा कोरे (गोल्ड मेडल), आकाश तोरडमल (गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ पदक), प्रताप काळे (गोल्ड मेडल), अभिजीत धुमाळ (गोल्ड मेडल), ओमकार डमरे (गोल्ड मेडल) तसेच संस्कृती शिंदे (कबड्डीमध्ये अश्वमेध स्पर्धेसाठी निवड) या पदकविजेत्या खेळाडूंचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, माजी विद्यार्थी विजय तोरडमल, भूषण ढेरे तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवकवर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
खेळाडूंच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.