आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केलेल्या व मागणी केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या 1.30 कोटींच्या विविध कामांना मंजुरी.
तीर्थक्षेत्र विकास व ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा समावेश

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध विकास कामे मंजूर करत व आवश्यक त्या ठिकाणी पाठपुरावा करत आमदार रोहित पवार हे कायमच मतदारसंघातील नागरिक व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. अशातच कर्जत -जामखेड मतदारसंघातील जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत येणारी विविध अशी एकूण 1.30 कोटींची विकास कामे नुकतीच मंजूर झाली असून यासाठी आमदार रोहित पवार यांनी विशेष प्रयत्न केले होते.
दरम्यान, नुकत्याच मंजुरी मिळालेल्या विकासकामांमध्ये 2023-24 आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये खर्डा, साकत, मिरजगाव, कोरेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश असून या योजनेअंतर्गत गावांतर्गत रस्ता करणे, सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे इत्यादी कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या विकासकामांना देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे व जामखेड तालुक्यातील रत्नापूर आणि मुंगेवाडी या गावातील स्मशानभूमी विकास करण्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत देखील जामखेड तालुक्यातील श्री भैरवनाथ देवस्थान, शिऊर व कर्जत तालुक्यातील श्री लिंबाजी महाराज देवस्थान निंबे या दोन तीर्थस्थळी भक्त निवास बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सर्व मिळून एकूण 1.30 कोटींच्या विविध विकासकामांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी मिळाली असून आता ही कामे लवकरच मार्गी लागणार आहे.
– आमदार रोहित पवार
(कर्जत-जामखेड विधानसभा)