
कर्जत (प्रतिनिधी) : हाताची पाची बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे जरी तुमचे स्वभाव वेगवेगळे असले तरी तुम्ही जेव्हा एकत्र येऊन उद्योग व्यवसायामध्ये आपली ताकद लावाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य उजळून निघेल असे प्रतिपादन ज्योतिताई सुर्वे यांनी केले, त्या कर्जत येथील शिक्षक कॉलनी प्रभाग क्रमांक 8 मधील महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होत्या.
ज्योतीताई सुर्वे, श्री.पुरी सर,लताताई येळपनेकर, स्वातीताई पाटील यांच्या उपस्थितीमध्येमहिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन प्रभाग क्रमांक ८ मध्ये करण्यात आले होते . उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना मा. ज्योतीताई यांनी अतिशय हसत खेळत महिलांशी संवाद साधला आणि विशेष म्हणजे संवादाची सुरुवात एका चांगल्या गाण्याने केली त्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, प्रत्येकीने वेगवेगळ्या विषयावर व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे एकमेकांशी चर्चा घडवून आणली पाहिजे. आपल्या कुटुंबाची प्रत्येक क्षणी आपण काळजी घेत असतो तितकीच काळजी आपण आपल्या आरोग्याची पण घेतली पाहिजे. नेहमी टेन्शन फ्री आणि हसत जगता आलं पाहिजे. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची त्याचबरोबर महिलांच्या समस्या,बचत गट संदर्भात मार्गदर्शन, आरोग्याचे प्रश्न, कर्ज प्रकरणे, उद्योग व्यवसाय, बाजारपेठ, शासकीय योजनांची माहिती, आर्थिक मार्गदर्शन, महिलांची बदलती मानसिकता त्याचबरोबर वेगवेगळ्या कोर्सेस ची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सक्षम महिलेच्या डोळ्यात जी वेगळी चमक असते ती संपन्न घरातील स्त्रीच्या डोळ्यात असतेच असं नाही. ही अशी कर्तुत्वाची वेगळी चमक प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात दिसावी या हेतूने सौ.सुनदाताई पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांच्या संयुक्त विद्यमाने या महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते असे
स्वाती पाटील यांनी प्रास्ताविक करताना म्हटले कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी महिलांसाठी नाष्ट व आईस्क्रीम ची व्यवस्था केली त्याचबरोबर प्रभागातील तेजस माने यांनी नव्याने सुरू केलेले हॉटेल गारवा यांच्याकडून सर्व महिलांना शिपी आमटी भेट देण्यात आली सर्व महिलांच्या वतीने स्वागत करुन त्यांचे आभार व्यक्त करताना शबनम मुंडे यांनी सांगितले. या महिला मेळाव्यासाठी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या