जागतिक महिला कुस्तीपटू व प्रशिक्षक डॉ. पै.शबनम शेख यांचा हशु आडवाणी विद्यालयात सन्मान…!

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- दि.२४/०७/२०२३ कर्जत तालुक्यातील आबिजळगाव येथील जागतिक महिला कुस्तीपटू व कुस्ती प्रशिक्षक, महान भारत केसरी पुरस्कार विजेत्या, तसेच कुस्ती विषयामध्ये पीएचडी करणाऱ्या पहिल्या महिला व सुलतान आणि दंगल चित्रपटासाठी ट्रेनर म्हणून भूमिका पार पडलेल्या डॉ.पै.शबनम शेख यांचा हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथे सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अल्लाउद्दीन एस. काझी साहेब होते.
यावेळी पैलवान शबनम शेख यांचे पिताजी मेजर शब्बीर भाई शेख, कर्जत तालुका मोटार चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मा.जाकिरभाई काझी , समाज विकास संस्थेचे संचालक व युवा नेते मा.साहिलदादा काझी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र नष्टे सर यांनी केले. यावेळी डॉक्टर पैलवान शबनम शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्या ध्येयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे सुचित केले. त्यांनी मिळवलेल्या या कुस्ती क्षेत्रातील यशाबाबत त्यांनी वेळेबाबत किती जाणीवपूर्वक लक्ष दिले व त्याचबरोबर अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली त्यामुळे यश संपादन केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. युवा पिढीने कुठल्याही परिस्थितीत मोबाईल, टी.व्ही आणि इतर प्रसार माध्यमे यांच्या आहारी न जाता यश संपादन करता येते हे त्यांनी आपल्या अनुभवावरून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अल्लाउद्दीन काझी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पैलवान शबनम शेख यांचे ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल कौतुक केले मिळवलेल्या यशात पिताजींनी केलेले मार्गदर्शन त्यांनी महत्त्वपूर्ण मानले. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवड प्रा.दिगांबर साळवे यांनी केली तर अनुमोदन प्रा. विजय शेलार यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विठ्ठल काळे यांनी केले.