महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आयोजित दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ या काळात ‘व्याख्यानमाला’ चे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. १२ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी ‘सशक्त युवक, सशक्त भारत’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी जागतिक दर्जाचे व्याख्याते, युवकांसाठी नवप्रेरणा देणारे डॉ. राज मोहन काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. अंबादासजी पिसाळ, ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर, मा. बाळासाहेब साळुंके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुभाषचंद्र तनपुरे, मा. मा. तात्यासाहेब ढेरे, मा. अमितजी तोरडमल,राजेंद्र तनपुरे, डॉ. निंबाळकर आदि मान्यवर तसेच महाविद्यालयाचे सर्व शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग, सर्व माजी विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. राज मोहन काळे यांनी युवकांना नवप्रेरणा सांगताना एकाग्रता जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. पैसे कमावण्यासाठी आणि जीवनाचा उद्धार करण्यासाठी शिक्षण खूप गरजेचे आहे. शिक्षणात समर्पण खूप महत्त्वाचे असते. आयुष्यभर योग सोबत नसतात तर योग्यता सोबत असणे गरजेचे आहे. खरे शिक्षण शाळा महाविद्यालयांमधूनच मिळते. सोशल मीडियातून, चॉईस बेस्ड शिक्षणातून उपयुक्त शिक्षण मिळत नाही. विद्यार्थी दशेच्या वयातच आपण घडत असतोत. त्यामुळे वेळेची किंमत जाणा, हल्लीची तरुणाई मोबाईल बघून-बघून मशीनगत झाली आहे. जुन्या काळातला पत्रव्यवहार आज थांबला आहे. त्यावेळी संवाद व्हायचा, संवादाची घडी विस्कटली आहे. विद्यार्थ्यांची पहिले दैवत आई-वडील आणि दुसरे दैवत हे गुरुजन आहेत. 90% लोक आजच्या जगण्यापुरते पाहतात, परंतु भविष्यातील नियोजन करत नाहीत. ज्ञानामुळे आत्मविश्वास वाढतो. जगाच्या बाजारात स्वयंघोषित अनेक जगद्गुरु आहेत परंतु त्यांच्याकडून योग्य शिक्षण तुम्हाला मिळणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा.अंबादासजी पिसाळ यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी गुरु महती विशद केली. तरुण पिढीला नेहमी बुजुर्ग लोक मार्गदर्शन करत असतात. तरुण घडला तरच भारत देशसुद्धा घडेल. कर्जत शहरात सद्गुरु गोदड महाराजांचे जसे मंदिर आहे तसे दुसरे संस्कार मंदिर म्हणून दादा पाटील महाविद्यालयाला स्थान द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या माणसांशी संधान साधून, गुरूंकडून योग्य दिशा घेतली पाहिजे.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. प्रमोद परदेशी व इतर सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.