राज्यकर्त्यांना राज्य चालविताना कसरत, रोगराई वाढेल
गोदड महाराजांच्या संवत्सरीत यंदाचे भविष्य वर्तविले

कर्जत, (प्रतिनिधी) :- यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, धान्य कमी होईल, रोगराई पसरेल, राज्यकर्त्यांना जनतेच्या प्रखर विरोधास सामोरे जावे लागेल, देशात अराजकता माजेल, असे भाकित कर्जत येथील संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरीमध्ये करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षाचे भविष्य वर्तविण्यात आले आहे. हे भाकीत खरे ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कर्जत येथील संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षांची संवत्सरी लिहून ठेवली आहे. यामध्ये आगामी काळातील पिकपाणी, राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत लिहून ठेवले आहे. त्याचे वाचन दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी मंदिरामध्ये करण्यात येते. सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरात संवत्सरीचे वाचन केले जाते. प्रत्येक वर्षी संवत्सरीचे वाचन ऐकण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होत असते.
राजा व प्रजा या दोघांत रागामुळे कलह (विरोध) माजेल. त्यामुळे राज्यकत्यांना राज्य चालवित असताना जनतेच्या प्रखर विरोधास सामोरे जावे लागेल, त्यांच्यासाठी राज्य चालविणे ही तारेवरची कसरत असेल, व्यापार सुरुळीत चालू राहतील. चैत्र व वैशाख या दोन महिन्यात या व्यापारात मंदीचे वातावरण राहील.
जेष्ठ, आषाढ, श्रावण या तीन महिन्यात व्यापारात पहिल्या दोन महिन्यापेक्षा थोडा फरक दिसून येईन, भाद्रपद महिन्यात स्वस्ताई राहील. अश्विन महिन्यात पुन्हा मंदीचे वातावरण राहील. कार्तिक महिन्यात कांतीय नगरीसी म्हणजेच उत्तर भागातील जनतेला पिडा होईन, रोगराई व आगीपासून नुकसान होईल. मार्गशिर्ष पौष, माघ या तीन महिन्यात देशात अनागोंदी (अराजक) माजेल. फाल्गुन महिन्यात पाऊस पडेल.
चालू वर्षाच्या संवत्सर फलामध्ये श्री संत सद्गुरु गोदड महाराजांच्या भविष्य वाणीत थेट शेवटच्या महिन्यात म्हणजेच फाल्गुन या महिन्यात पाऊस पडेल, असे जरी सांगितले असले तरी व्यापार विषयक केलेल्या भविष्य वाणीनुसार पाऊस काळात पाऊस पडेलच, नाही असे नाही.