अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट; बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना

(कर्जत, प्रतिनिधी) :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत असताना, त्याच पार्श्वभूमीवर कायद्याने प्रतिबंधित असलेल्या बालविवाहांच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी कर्जत तालुका प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. “तालुक्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रवि सतवन यांनी दिला आहे.

तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयाने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून गावोगावी तसेच शहरांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह लावून देणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या विवाहात सहभागी होणारे आई-वडील, नातेवाईक, पुरोहित, मंगल कार्यालय मालक, वाजंत्री तसेच छपाई करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गावपातळीवर प्रत्येक विवाहापूर्वी वर-वधूचे वय तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. जन्मदाखला किंवा शाळेचा बोनाफाईड दाखला यांची पडताळणी केल्याशिवाय विवाह सोहळे पार पाडू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालय आणि लॉन्स मालकांनाही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
“बालविवाह ही केवळ कायदेशीर गुन्हा नाही, तर समाजाच्या भविष्यावर घाला आहे,” असे सांगत प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाने एकजुटीने पुढे येणे गरजेचे असल्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे.



