डी-वाय-१२ मुख्य चारीला कमी दाबाने पाणी; दुष्काळी छायेत शेतकऱ्यांची चिंता वाढली


राशीन (प्रतिनिधी) : जावेद काझी
कर्जत तालुक्यातील राशीनसह परीटवाडी, काळेवाडी, आतारकाळे वस्ती, काझी फार्म हाऊस, कदमवस्ती आणि भिताडेवस्ती आदी भाग ‘डी-वाय-१२’ मुख्य चारीवर अवलंबून आहेत. मात्र, या मुख्य चारीला आज दुपारी सोडण्यात आलेले शेतीचे पाणी अतिशय कमी दाबाने आणि मंद गतीने पुढे जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत मुख्य चारीलाच पूर्ण दाबाने पाणी येत नसल्याने पोटचारी व उपचारींवर अवलंबून असलेल्या शेतीला वेळेवर व पुरेसे पाणी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी चर्चा केल्यानंतर दुपारनंतर ‘डी-वाय-१२’ च्या उपचारीला पाणी सोडण्यात येईल, तसेच पुढील पाणी झाल्यावर पोटचारीला पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, मुख्य चारीतील विसर्गच संथ असल्याने हे आश्वासन कितपत पूर्ण होईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

यंदा एल नीनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन कमी पाऊस झाला आहे. परिणामी, बळीराजा दुष्काळाच्या गंभीर संकटात सापडला आहे. शेतात उभी पिके नाहीत, तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चाराटंचाई आणि पाण्याच्या अभावामुळे आगामी काळात जनावरे जगवायची कशी आणि शेती कशी सावरणार, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रशासनाने तातडीने मुख्य चारीचा जलविसर्ग पूर्ण दाबाने सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



