न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी गरुड झेप

समृद्ध कर्जत : – कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल, कर्जत या शाळेने 2024-25 या शैक्षणिक वर्षी देखील आपल्या यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8वी) शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत शाळेच्या एकूण 18 विद्यार्थ्यांनी यश मिळवून तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा गौरव वाढविला आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने व अभ्यासू वृत्तीने हे यश मिळवले असून, त्यामागे शिक्षकांचे अथक परिश्रम आणि पालकांचे योगदानही मोलाचे आहे.
या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संभाजी लांगोरे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच समन्वयक किरणजी नाईक सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्राचार्य शिवाजी पाटील सर व पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
शिष्यवृत्ती यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या मार्गदर्शनासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशामुळे न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपले स्थान अधिक भक्कम केले असून, पुढील वाटचालीसाठी शाळेला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.