कृषी सेवा केंद्रांमधून होतेय शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमधून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. खते तसेच बी- बियाणांची चढ्या दराने विक्री करून ही लूट केली जात आहे. कर्जत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीतील कृषी विभागाकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. कृषी सेवा केंद्र चालक आणि अधिकारी यांच्यात मिलीभगत असल्याने अधिकाऱ्यांकडून नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाया केल्या जात नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कर्जत शहरासह राशीन, मिरजगाव, कुळधरण, माहिजळगाव, भांबोरा, खेड आदी गावात मोठ्या संख्येने शासनमान्य कृषी सेवा केंद्र आहेत. ग्रामीण भागातही नव्याने अनेक कृषी सेवा केंद्र सुरु आहेत. मात्र काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्ती व नियमांचे पालन केले जात नाही. शासकीय नियम झुगारून ही दुकाने चालवली जात असताना कृषी विभाग मात्र सुस्त आहे. त्यांचे कृषी सेवा केंद्रांवर कसलेच नियंत्रण राहिले नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
काही केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना खतांसोबत इतर माल खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. खते तसेच बी – बियाणांची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना मागणी करुनही विहित नमुन्यातील पावत्या दिल्या जात नाहीत. दरफलक, उपलब्ध मालाचा साठा तसेच इतर माहिती दर्शवणारे फलक दर्शनी भागावर लावणे कृषी सेवा केंद्र चालकांना बंधनकारक आहे. मात्र याकडे चालकांकडून कानाडोळा केला जात आहे. रजिस्टरमध्ये खत बी- बियाणांच्या नोंदी ठेवणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र कित्येक कृषी सेवा केंद्र चालकांकडे हे रजिस्टरच उपलब्ध नाही.