दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवीच्या प्रथम वर्षासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नव्या शिक्षण प्रणालीमध्ये ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ हा नवीन विषय समाविष्ट करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षांच्या वर्गांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भाषणांनी माणूस घडविला आहे. संस्कृत ही भाषेची जननी आहे. भाषा अवगत करण्याचे कौशल्य निसर्गाने मानवाला दिले आहे. भाषेच्या आकलनामुळे ज्ञानाचा स्फोट झाला आहे. भाषेने माणसाची जडणघडण केली आहे. त्याचबरोबर संस्कृतीचीही जडणघडण भाषेने केली आहे. भाषा एक शास्त्र असते. भाषा ही मानवी व्यवहारास सहाय्यक ठरते. भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे गरजेचे आहे .
या कार्यशाळेत भाषेचा अर्थ, स्वरूप, उगम, कालिक टप्पे, भाषाकुल संकल्पना आदि विषयांवर या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचे उपप्राचार्य, पदवीच्या वर्गाला शिकविणारे प्राध्यापक, तसेच पदवीच्या प्रथम वर्षातील बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.सी.एस या वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आय.के.एस चे समन्वयक प्रा. अगस्ती तोरडमल व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.