जिल्ह्यातील एसटीच्या सर्व चालक वाहकांना नियोजित बस थांब्यावर बस थांबविण्याबाबत विभाग नियंत्रकांच्या महत्वाच्या सुचना

चापडगावमधील बस थांब्यावर एसटी बस न थांबता उड्डाणपूलावरुन थेट निघून जात असल्याबाबतची तक्रार ॲड. विकास शिंदे यांनी एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अहमदनगरचे विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती. तसेच त्याबाबतचे पुरावे म्हणून काही व्हिडीओही पाठविण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व एसटी डेपो, चालक वाहकांना याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. हे काम होत असताना गावोगावी उड्डाणपूल करण्यात आले आहेत. त्यामुळे अगोदर रस्त्यालगत असलेले बस थांबे उड्डाणपूलाच्या खाली गेले आहेत. रस्ते चांगले झाल्यामुळे एसटी बसचे चालक वाहक गावोगावच्या नियोजित बस थांब्यांवर जाण्यास टाळाटाळ करुन उड्डाणपूलावरुन थेट निघून जाताना आढळून येत होते. प्रवाशांना मात्र यामुळे प्रचंड हाल सोसावे लागतात.
याबाबत काही प्रवाशांनी बस गावातील नियोजित थांब्यावर येत नसल्यामुळे हाल होत असल्याबाबत तक्रारी ॲड. विकास शिंदे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानंतर ॲड. शिंदे यांनी प्रवाशांच्या वतीने एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत रितसर तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाचे अहमदनगर विभाग नियंत्रक यांनी ‘अहिल्यानगर विभागातील सर्व आगारातील आगार व्यवस्थापक यांच्या मार्फत चालक/वाहक यांना रा. प. बसेस नियोजित बस थांब्यावर बस थांबविणे बाबत, सर्व रा. प. बसेस बस स्थानकात जावून प्रवासी चढउतार करणे बाबत सुचना देण्यात आल्या आहेत.’ असे पत्राद्वारे ॲड. विकास शिंदे यांना कळविले आहे. तसेच ‘आपणास झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत.’ असे सदर पत्रात नमूद केले आहे.
आम्ही केलेल्या तक्रारीनंतर आणि विभाग नियंत्रकांच्या सुचनेनंतर एसटी बसचे अनेक चालक वाहक गावातील नियोजित बस थांब्यावर येताना दिसत आहेत. मात्र हे योग्य पद्धतीने कायमस्वरूपी सुरु राहीले पाहिजे यासाठी विभाग नियंत्रकांनी याकडे भविष्यातही लक्ष द्यावे अशी विनंती केल्याचे ॲड. विकास शिंदे यांनी सांगितले.