दादा पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले. देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला
या संविधान दिनी आपली मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्यासंबंधी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन सामूहिकरित्या करण्यात आले. या संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या लोकसंख्येचा एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य राज्यघटनेमुळे सर्व भारतीयांना प्राप्त झाले आहेत.
या संविधान दिनाचे आयोजन एन.एस.एस विभाग, सांस्कृतिक विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते