नियोजित एमआयडीसी कर्जत जागेची औद्योगिक महामंडळाच्या पथकाने केली पाहणी

कर्जत (प्रतिनिधी) :-कर्जत औद्योगिक वसाहत होण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या हालचालींना आला वेग आला आहे. कर्जत नियोजित एमआयडीसी जागेच्या पाहणीचा अहवाल शासनाला आठ दिवसामध्ये सादर करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आ. प्रा. राम शिंदे यांच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत ठरले होते. त्याप्रमाणे मागील रविवारी कर्जत येथे आ प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे प्रादेशिक अधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, नागरिक यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ६ जागांची मागणी नागरिकांमधून आलेली होती.
या जागांची पाहणी करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी दि.२२ डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यामध्ये आले होते. प्रथम त्यांनी कोंभळी, थेरगाव, रवळगाव या जागेची पाहणी केली त्यानंतर वालवड, सुपा या जागेची पाहणी करून नंतर पथक कर्जत पठारवाडी, अळसुंदा, देऊळवाडी सिद्धटेक या जागांची पाहणी करत रवाना झाले. या जागांव्यतिरिक्त ही आणखी एखादी सुयोग्य जागा असेल तर त्याचाही या औद्योगिक वसाहतीसाठी विचार केला जाणार आहे.
नियोजित औद्योगिक वसाहतीच्या जागेचा अहवाल शासनास त्वरीत सादर होणार आहे.
त्यामुळे पुढील कामास आता वेग येणार असून लवकरच जागेवर शिक्कामोर्तब होऊन औद्योगिक वसाहतीसाठी मंजुरी घेऊन हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. शेतकऱ्यांनी नियोजित जागेची खरेदी विक्री करू नये असे, आवाहन आ. राम शिंदे यांनी केले आहे असे भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी सांगितले. पाहणी पथकाबरोबर कोंभळी येथे काकासाहेब तापकीर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, स्वप्निल तोरडमल, गणेश पालवे, रमेश अनारसे, जिजाबापू अनारसे, पंडीत अनारसे उपस्थित होते.