दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ तथा वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. ‘मराठी भाषा, साहित्य आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते
याप्रसंगी बोलताना डॉ. भरत जाधव यांनी सांगितले की, मराठी भाषेचे उपयोजन विद्यार्थ्यांना करता आले पाहिजे. ज्ञान आणि भाषा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषा पक्की असेल तर जगातील कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. मराठी भाषेतून शिक्षण घेताना नोकरीच्या प्रचंड संधी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मुद्रित शोधक, प्रकाशक, सूत्रसंचालक, पटकथा लेखक, संवाद लेखक, जाहिरात लेखक, भाषा संशोधक, प्रबोधनकार, प्रवचनकार, कीर्तनकार, साहित्यिक, प्राथमिक. माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राध्यापक होण्याची शिक्षण क्षेत्रातील संधी, प्रसारमाध्यमे, अनुवादक किंवा दुभाषक, नागरी सेवा आदि असंख्य क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व रोजगाराच्या संधी मराठी विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत मराठी विषयाचा विद्यार्थी जाऊ शकतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर खूप मोठा बदल होऊन त्याचा फायदा विद्यार्थी, शिक्षक, संस्था व समाजाला होवू शकतो
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुखदेव कोल्हे, आभार डॉ. भारती काळे व सूत्रसंचालन प्रा. सीमा डोके यांनी केले