
कर्जत (प्रतिनिधी) :- आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांसह जनावरच्या चारा पिकांना पाटपाणी मिळावे मागणीसाठी आक्रमक झालेल्या आमदार पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी मिरजगाव येथे अहमदनगर-सोलापूर महामार्ग अडविला होता.
सीना धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील धरण लाभक्षेत्रातील शेतीसाठी मागणी करून देखील पाणी सोडले जात नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी मिरजगाव येथे सुमारे एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. मिरजगाव परिसरातील अनेक
गावे शेतीच्या सिंचनासाठी सीना धरणातून सुटणाऱ्या पाटपाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सीनाचे आवर्तन लवकरात लवकर सोडावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी
आंदोलंकर्त्यांनी यावेळी केली होती. या आंदोलनाला यश आल्याने आज सोमवार दिनांक १२ रोजी सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.