दादा पाटील महाविद्यालयाची प्राजक्ता प्रमोद पठाडे ठरली सुवर्णपदकाची मानकरी

कर्जत (प्रतिनिध) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची प्राजक्ता प्रमोद पठाडे हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘श्रीमती निलिमाताई पवार सुवर्णपदक’ करिता नुकतीच निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थिनीची निवड करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने ‘श्रीमती निलिमाताई पवार सुवर्णपदक २०२३’ करिता दादा पाटील महाविद्यालयाच्या कु. प्राजक्ता प्रमोद पठाडे या विद्यार्थिनीची निवड केलेली आहे. सदर सुवर्णपदक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी प्रदान करण्यात येणार आहे.
दादा पाटील महाविद्यालयाच्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेमध्ये दरवर्षी जवळपास दीडशे विद्यार्थी सहभागी होतात. या योजनेत सहभागी झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आवश्यक आर्थिक मदत मिळते. कमवा शिका योजनेमध्ये सहभागी झालेले महाविद्यालयातील अनेक गुणवंत विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.
सुवर्णपदक विजेत्या प्राजक्ता प्रमोद पठाडे हिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दीपकशेट शिंदे, तात्यासाहेब ढेरे, ऋषिकेश धांडे, विजय तोरडमल,भाऊसाहेब रानमाळ, श्रीकांत शिंदे, प्रा. प्रकाश धांडे, पत्रकार गणेश जेवरे, प्रा. विशाल म्हेत्रे, सुनील शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा. सागर शिंदे मेजर डॉ. संजय चौधरी, डॉ. संतोष भुजबळ हे उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर यांनी तसेच विद्यार्थी विकास समितीमधील सर्व सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी प्राजक्ता पठाडे हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.