सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे दादा पाटील महाविद्यालयात शानदार उदघाटन

कर्जत (प्रतिनिधी) :- महाविद्यालयीन युवकांमध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे विभागीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनजेमेंट, विधी आदि शाखेचे जवळपास ४०० संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
विभागीय अविष्कार संशोधन स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठानचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील डॉ. श्रीराम गडकर हे उपस्थित होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे तसेच विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे परीक्षक डॉ. रमेश देवकाते, डॉ, नितीन जाधव, डॉ. तानाजी चव्हाण, डॉ. अमर भोसले, डॉ. प्रमोद परदेशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
अविष्कार संशोधन स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. श्रीराम गडकर यांनी सांगितले की, नाविन्यपूर्ण उपक्रम हे अखिल मानवी जीवनाचे कल्याण करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये दडलेल्या राजहंसाला व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे, अशी संधी आविष्कारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. या स्पर्धेमधूनच भविष्यातील तत्त्वचिंतक, संशोधक, शास्त्रज्ञ व उद्योजक घडणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ यांनी सांगितले की, मानवाने आज खूप प्रगती केलेली आहे परंतु अजूनही काही क्षेत्रात प्रगती होणे गरजेचे आहे. मनातील दडलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अशा स्पर्धा प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी म्हटले की, समस्या व उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातून शोधाची सुरुवात होत असते. गरज ही शोधाची जननी आहे. हे असं का? या प्रश्नातून शोध लागतात. विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत, कोणत्याही शोधाला आदि असतो परंतु अंत असत नाही. शोध ही अव्याहतपणे चालणारी गोष्ट असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
विभागीय अविष्कार संशोधन स्पर्धेला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या
आविष्कार संशोधन स्पर्धेचे संयोजक म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. संदीप पै, शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक डॉ. महेश भदाणे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या आविष्कार संशोधन स्पर्धेला अनेक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी भेट दिली. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे व प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे यांनी मानले.