कर्जतमध्ये कुस्त्यांचा थरार; ‘राजमुद्रा केसरी’ गदेसाठी दिग्गजांचा महासंग्राम


कर्जत (प्रतिनिधी) : -कर्जतची माती पुन्हा एकदा तापणार आहे… अंगावर शहारे आणणाऱ्या कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी तालुका सज्ज झाला आहे. कै. पै. भास्कर (दादा) गुलाबराव तोरडमल आणि कै. पै. दिलीप (नाना) गुलाबराव तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ‘राजमुद्रा केसरी’ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रंगणार आहे. ठिकाण – कै. पै. दिलीप (नाना) तोरडमल क्रीडा संकुल, कर्जत.
कर्जतच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीला नवा उंचाव देणाऱ्या या मैदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मातीतल्या घामाचा सुगंध, ढोल-ताशांचा गजर आणि प्रेक्षकांचा जल्लोष… या सगळ्यातून एक वेगळाच ‘कुस्ती उत्सव’ अनुभवायला मिळणार आहे.

या भव्य सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अभिजीत कर्डिले, सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार बबनराव पाचपुते,यांच्यासह तोरडमल परिवारातील प्रमुख मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मैदानाची प्रतिष्ठा आणखी उंचावणार आहे.

२ किलो चांदीची गदा; दिग्गज आमनेसामने
या मैदानाचे मुख्य आकर्षण म्हणजे २ किलो चांदीची ‘राजमुद्रा केसरी’ गदा. यासाठी देशपातळीवरील दिग्गज पैलवान आमनेसामने भिडणार आहेत.
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हरियाणा केसरी मनजीतसिंग हनुमंत पुरी (सोलापूर) विरुद्ध बापू अपराध (सांगली) कर्जत केसरी रोहित मोडळे विरुद्ध मनोज पवार (आष्टी) या लढतींमधून ‘जिंकणारा कोण?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात धुमाकूळ घालत आहे.
यामध्ये प्रामुख्याने राजमुद्रा केसरी किताबासाठी तोरडमल तालमीतील पैलवान गणेश चव्हाण विरुद्ध कवलापूरचा अक्षय माळी अशी लढत होणार आहे
स्थानिक मल्लांनाही संधी विजयकुमार (काका) तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम भिसे गणेश चव्हाण दत्ता देवकाते धुळाजी इरकर सुयोग माने यश धोदाड किरण जाधव हर्षवर्धन पठाडे यांसारखे ५० हून अधिक स्थानिक मल्ल आपल्या ताकदीची झलक दाखवणार आहेत. हीच खरी कर्जतच्या कुस्ती परंपरेची ताकद मानली जाते.
“स्वच्छ कर्जत – सुंदर कर्जत – हरित कर्जत” या संदेशातून या मैदानाला सामाजिक स्पर्श देण्यात आला आहे. झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी हाती घेतला आहे.
कर्जतकरांनो, हा फक्त कुस्तीचा सामना नाही…
ही आहे परंपरेची शान, मातीचा अभिमान आणि ताकदीचा उत्सव! राजमुद्रा ग्रुपच्या वतीने सर्व कुस्तीप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



