व्हाट्सॲप ग्रुप ओन्ली अॅडमिन ठेवा : पीआय अरुण पाटील

कर्जत (प्रतिनिधी) :- सोशल मीडियावरून दोन जाती धर्मात तेढ निर्माण करणे तसेच आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांकडून केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना विशेष काळजी घ्यावी. वैयक्तिक पातळीवर टीका करू नये. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पाटील यांनी दिला आहे व्हॉट्सअॅपवर ग्रुपच्या अॅडमिनने ‘ओन्ली अॅडमिन’ ही सेटिंग करून घ्यावी. सोशल मीडियातून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यात सामाजिक शांतता रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात. दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार केले जातात. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वाद निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येत असलेले मेसेज, फोटो आणि मजकूर यावर कोणताही विश्वास ठेऊ नये, त्याची सत्यता पडताळून घ्यावी. आलेले मेसेज समोर फॉरवर्ड करू नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसात वाद न घालता नागरिकांनी संबंधित व्यक्तीची माहिती तात्काळ कर्जत पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले आहे