प्रा. वनदास पुंड व डॉ. सुमन पवार यांचा सेवापुर्ती समारंभ दादा पाटील महाविद्यालयात संपन्न.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वनदास पुंड व डॉ. सुमन पवार यांचा सेवापूर्ती सन्मान कार्यक्रम महाविद्यालयाच्या स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने नुकताच संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्रतात्या फाळके तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सुभाषचंद्र तनपुरे तसेच तसेच प्रा. वनदास कुंड व डॉ. सुमन पवार यांचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. तसेच प्रा. वनदास पुंड व डॉ. सुमन पवार यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा आढावा घेतला.
याप्रसंगी रावजी सखाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे प्राचार्यपदी नेमणूक झाल्याबद्दल प्रा. मोहनराव खंडागळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. डी. एस. कुंभार, प्राणीशास्त्र विभागप्रमुख व डॉ. कैलास रोडगे, अर्थशास्त्र विभागप्रमुख पदावर नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्राणीशास्र विभागाचे डॉ. डी. एस. कुंभार, अर्थशास्त्र विभागाचे डॉ. कैलास रोडगे, सौ. वनिता पवार, कु. हर्षदा थोरात, मनमोहनदास खुडे यांनी याप्रसंगी मनोगते व्यक्त केली.
प्रा. वनदास पुंड यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, औंध, राजापूर, पनवेल, पुंडे, कोपरगाव आदि शाखांमध्ये सेवा केलेली आहे. दादा पाटील महाविद्यालयातून ते निवृत्त होत आहेत. सेवा करत असताना, प्राचार्य, प्राध्यापक व ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. सुमन पवार यांनी २८ वर्षे अहमदनगरच्या राधाबाई काळे महाविद्यालयामध्ये सेवा केली. खडतर परिस्थितीमध्ये राधाबाई काळे महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींचा प्रवेश व्हावा म्हणून प्रयत्न केले. ही शाखा प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थिनी येत होत्या. शॉर्ट टर्म कोर्सचे त्यांनी यशस्वी आयोजन केले. आजपर्यंत त्यांनी केलेला विद्यार्थी ते शिक्षक असा सगळा प्रवास रयत शिक्षण संस्थेच्या शाखेत झालेला आहे. संकटातून मार्ग काढण्याचे कौशल्य कर्जत महाविद्यालयाने दिल्याची भावना डॉ. सुमन पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. वनदास पुंड व डॉ. सुमन पवार यांच्यावतीने दादा पाटील महाविद्यालयाच्या ‘गरीब विद्यार्थी निधी’ करिता दोघांच्या वतीने एकूण १६ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
प्रमुख अतिथी व रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांनी मनोगतात सांगितले की, दादा पाटील महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी, प्राध्यापक म्हणून दादा महाविद्यालयाशी निगडित आहे. सेवानिवृत्त होत असलेल्या दोन्ही प्राध्यापकांना त्यांनी शुभेच्छातून ऊर्जा देण्याचे काम केले. प्रामाणिकपणे सेवा केली तर सर्व घटक साथ देतात, अगदी विद्यार्थीसुद्धा आपल्याशी प्रामाणिक राहतात. हा अनुभव त्यांना स्वतःला लाभल्याचेही सांगितले. सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही प्राध्यापकांनी भविष्यामध्ये आपला वेळ नातवांना, मुलांसाठी देऊन शक्य झाल्यात परदेशातील सहल अनुभवावी असे सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या दोन्ही प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. कर्जत महाविद्यालय हे ग्रामीण भागातले अग्रणी कॉलेज आहे. या महाविद्यालयामध्ये सेवा करताना परिसरातील विद्यार्थ्यांशी, ग्रामस्थांशी आपली नाळ घट्ट जुळते. इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या दादा पाटलांनी दादा पाटील महाविद्यालय स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णत्वास आणले. आज अनेक सेवकांच्या, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दादा पाटील यांचे स्वप्न साकारताना दिसत आहे. आपल्या कामाचा ठसा आपल्याला नेहमी संधी देऊन जात असतो. महिला स्वतंत्र नसतात असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेे आहे. तसेच कुसुमाग्रजांनीही एका कवितेत महिलांना दासी म्हणून पाहू नका असे म्हटले आहे. महिलेची उंची ही कर्तुत्वाने वाढत असते. महिलांनी हे कायम सिद्धही केले असल्याची भावना यावेळी राजेंद्रतात्या फाळके यांनी व्यक्त केले.
प्रा. वनदास पुंड व डॉ. सुमन पवार यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. संतोष भुजबळ यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले.