मका, पिकातील, कीड, व रोग, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची शेतीशाळा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांची शेतीशाळा महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 13/12/2024 रोजी मका पिकाची शेतीशाळा मौजे निमसाखर तालुका इंदापूर येथे तालुका कृषि अधिकारी इंदापूर श्री रुपणवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. सदर शेतीशाळेत मका पिकातील कीड व रोग तसेच लष्करी आळी बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रक्षेत्र भेट आयोजीत करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना कृषि अधिकारी श्री.योगेश फडतरे साहेब,कृषि पर्यवेक्षक श्री सचीन चितारे साहेब व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री .विजय बोड़के साहेब यांनी लष्करी अळी व त्यासाठी कामगंध सापळ्यांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक श्रीमती घोडके एस. यू यांनी कृषि विभागाच्या योजनंनाबद्दल माहिती दिली .
मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करी अळी बहुभक्षिय असून मका व ज्वारी हि तिची आवडती खाद्य आहेत. या किडीच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ या चार अवस्था आहेत. अळी ही सर्वात विध्वंसक अवस्था असून ती पाने खावून पिकांचे नुकसान करते. त्यामूळे पानाला चट्टे,छिद्रे पडतात. पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. पिकाची पोंगे अवस्था अळीला सर्वांत जास्त बळी पडते. यावर नियंत्रण करण्यासाठी शेताची खोल नांगरणी करावी. तसेच कामगंध सापळ्यांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना सुचित केले. यावेळी शेतकरी मित्र राजेंद्र पवार, प्रकाश शिंदे व शेतकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.