दादा पाटील महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे.. राजेंद्र(तात्या) फाळके

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘दि.११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३’ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाड्मय आयोजित महाविद्यालयात ‘१४ तास सलग अखंड वाचन’ उपक्रमाचे आयोजन
महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये केले होते.या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र(तात्या) फाळके, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच सर्व शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
‘सलग १४ तास अखंड वाचन’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र फाळके यांनी ‘शिव, शाहू, फुले, आंबेडकर’ हे विचारांचे भांडार आहे, वाचनाची आवड स्वतःहून जोपासावी लागते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाचनामुळे, शिक्षणामुळे घडले. आजच्या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावेत, असा मौलिक संदेश आपल्या मनोगतातून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की, पुस्तकांनी माणसाचे मस्तक घडते, ज्ञानाने जीवन घडते, वाचनाने प्रेरणा निर्माण होते. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन वाडमय मंडळाचे चेअरमन डॉ. आनंद हिप्परकर व सहकाऱ्यांनी केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राम काळे यांनी केले. उपस्थितांचे आभार कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले