आमदार रोहित पवार यांनी घेतली मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट
कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवा अथवा आपल्या अधिकारात आवर्तन सोडण्याचे आदेश द्या, अशी आमदार रोहित पवार यांची विनंती

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली आहे. आपल्या मतदारसंघातून जाणाऱ्या कुकडी डावा कालवा यावर एकूण 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. या भागातील शेतकऱ्यांना सोडण्यात आलेले मागील हंगामातील आवर्तन मार्च 2023 मध्ये संपून जवळजवळ एक ते दीड महिना उलटला आहे आणि सध्या उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी वरचेवर खालावत आहे.
दरम्यान चारा पिके, फळबागा, उन्हाळी पिके इत्यादी पिकांसाठी पाण्याची टंचाई भासत आहे यासाठीच आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक घ्या अथवा आपल्या अधिकारातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली आहे. मतदारसंघात फिरत असताना अनेक शेतकऱ्यांकडून होणारी कुकडीच्या पाण्याची मागणी तसेच कुकडी प्रकल्पातून भोसेखिंड येथून सीना धरणात पाणी सोडण्यासाठी देखील शेतकऱ्यांची मागणी आमदार रोहित पवार यांनी लक्षात घेतली व त्याबाबत लाभ क्षेत्रातील गावांना उन्हाळी आवर्तन पूर्ण दाबाने सोडता येईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल ही गोष्ट मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आणि ओलिताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावावी अथवा आपल्या अधिकारात पुढच्या काही दिवसात उन्हाळी आवर्तन सुरू करण्याबाबतचे आदेश द्यावेत अशी विनंती यावेळी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मागच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीचे तीन आवर्तन द्यावे लागतील याबाबतचा विषय आमदार रोहित पवार यांनी मांडून त्यापैकी उन्हाळी आवर्तन कुठल्याही परिस्थितीत योग्य वेळेत द्यावे लागेल, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर दोन आवर्तनानंतर उन्हाळीच्या बाबतीत आपण चर्चा करू, असं चंद्रकांत दादांनी बैठकीत स्पष्ट केलं होतं. त्याच अनुषंगाने आता परत एकदा मागणी करून आता हीच पाणी सोडण्याची योग्य वेळ आहे त्यामुळे आवर्तनाचे पाणी सोडून सहकार्य करावे, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
–
(कर्जत-जामखेड विधानसभा)